पांडुरंग मडकईकर यांचे भाजप सोडण्याचे संकेत; नवा पक्ष काढण्याचे सुतोवाच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 08:30 AM2023-04-10T08:30:02+5:302023-04-10T08:30:44+5:30
मी संपणार नाही, मी देवाचे स्पेशल एडिशन!
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: पेडणे, वाळपई, सांगेहून अनेकजणांनी मला भेटून नवीन पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे. मी याबाबत गंभीरपणे विचार करीत आहे, असे सुतोवाच कुंभारजुवेचे माजी आमदार पांडुरंग मडकईकर यांनी पुन्हा एकदा केले आहे. ते भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मडकईकर म्हणाले की, मी संपणार नाही. मी देवाचे स्पेशल एडिशन आहे. लोकांची कामे करण्यासाठी देवाने मला मोठ्या आजारातून बरे केले. मी पुन्हा एकदा सक्रिय झालो आहे.
माझे नेतृत्व केवळ तिसवाडीपुरतेच मर्यादित नाही. मी मंत्री म्हणून तमाम गोवेकरांसाठी काम केले आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची स्वप्ने घेऊन मी पुढील वाटचाल करीत आहे. गोव्यात स्थिर झालेले काही राजकीय पक्ष जुन्या नेत्यांना किंमत देत नाहीत. सत्ताधारी पक्षातून बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन केल्यास ईडी, पोलिस वगैरे मागे लावले जाण्याची भीती तुम्हाला वाटत नाही का? या प्रश्नावर मडकईकर म्हणाले की, मला कशाचीही भीती वाटत नाही. देवाने विशेष कामगिरी बजावण्यासाठीच मला आजारातून बरे केले आहे. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ असल्याची टीकाही त्यांनी केली.
जेनिताविरुध्द भाजपचे दोन नेते प्रचार करत फिरले
विधानसभा निवडणुकीवेळी भाजपचेच अनुसूचित जमातीचे दोन नेते कुंभारजुवेत फिरले आणि त्यांना एसटी समाजाच्या लोकांना जेनिताला मते देऊ नका, असे आवाहन केले. यातील एका नेत्याला तर जेनिता निवडून आल्यास आपल्याला मंत्रिपद मिळणार नाही, याची भीती होती व लोकांना तसे तो सांगतही होता. एसटी समाजाच्या या दोन नेत्यांनीच समाजाच्या महिला उमेदवाराकडे दगाबाजी केली. हे नेते कोण, ते सर्वांनाच ठाऊक आहे, असे म्हणत त्यांनी कोणाचेही नाव घेण्याचे टाळले.
एकाच माळेचे मणी
भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी असल्याचा आरोप त्यांनी केला. मडकईकर म्हणाले की, काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदाराला वर्ष व्हायच्या आत भाजपमध्ये प्रवेश दिला. हे सर्व पूर्वी ठरलेले व साटेलोटेच असणार यात दुमत नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"