कथित लाचप्रकरणी पांडुरंग मडकईकर यांचा यू टर्न; एसीबीसमोर सांगितले, 'मी लाच नव्हे, दंड भरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 08:18 IST2025-03-22T08:17:58+5:302025-03-22T08:18:56+5:30
या जबाबच्या आधारे एसीबीने या प्रकरणाचा तपास बंद केला आहे.

कथित लाचप्रकरणी पांडुरंग मडकईकर यांचा यू टर्न; एसीबीसमोर सांगितले, 'मी लाच नव्हे, दंड भरला
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्र्याला आपण लाच दिलीच नव्हती, असे म्हणत कथित लाच दिल्याचे विधान केल्याप्रकरणी आता माजी आमदार पांडुरंग मडकईकर यांनी यू-टर्न मारला आहे. मडकईकर यांनी तसा जबाब भ्रष्टाचार विरोधी पथकाला (एसीबी) समोर नोंद केली आहे.
या जबाबच्या आधारे एसीबीने या प्रकरणाचा तपास बंद केला आहे. विद्यमान सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचार नव्हे तर लूट सुरू आहे. आपल्याच एका लहानशा कामासाठी एका मंत्र्याला १५ लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप करून मडकईकर यांनी खळबळ उडवून दिली होती. मडकईकरांच्या विधानाची चौकशी करावी, अशी तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एसीबीकडे केली होती.
त्याअनुषंगाने एसीबीने माजी मंत्री मडकईकरांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी आपल्या दिलेल्या जबाबामध्ये मंत्र्याला कोणतीच लाच दिली नाही, उलट कामासंदर्भातील चुकीमुळे दंड भरला. आपला चुकीचा समाज झाला आणि त्यातून ते विधान केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मडकईकर यांनी आपल्या जबाबामध्ये लाच दिल्याचे नाकारल्याने एसीबीने सदर प्रकरणाचा तपास बंद केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
४ मार्च रोजी संतोष यांना भेटून आल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांकडे बोलताना मडकईकर यांनी सरकारमधील भ्रष्टाचारावर टीका केली होती. किरकोळ कामासाठी एका मंत्र्याला १५ - २० लाख रुपये द्यावे लागल्याचा आरोप केला होता. याची आठवण करून देताच, मडकईकरांनी ती रक्कम सरकारी शुल्क असल्याचे सांगून ती पक्षांतर्गत बाब असून पक्षांतर्गत चौकशी सुरू असल्याचे म्हणाले.
पांडुरंग मडकईकरांची दिलेला जबाब
जमिनीच्या व्यवहारासंबंधीच्या कामासाठी जानेवारीत आपल्या अधिकाऱ्याने २४ लाख रुपये जमा केले होते. आपल्या चुकीमुळे २१ लाख रुपयांचा दंड भरावा लागला. दंडाची रक्कम ही लाच म्हणून दिल्याचे समजून आपण माध्यमांसमोर विधान केले होते. आपण कोणत्याच मंत्र्याला लाच दिलेली नाही.