पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या सहा तासात ४५.७८ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 02:20 PM2019-05-19T14:20:54+5:302019-05-19T14:59:20+5:30
माजी मुख्यमंत्री तथा पूर्व केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आज मतदान सुरू आहे.
पणजी - माजी मुख्यमंत्री तथा पूर्व केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आज मतदान सुरू आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ४५.७८ टक्के मतदानाची नोंद झाली असून कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान सुरू आहे.
सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले. शहरातील मासान द आमोरी येथे बूथ क्रमांक ९ मध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये लिंक समस्या निर्माण झाल्याने व्हीव्हीपीएटीच्या बाबतीत प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सुमारे २0 मिनिटे मतदान थांबविण्यात आले. नंतर हे ईव्हीएम बदलण्यात आले. मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी वेब कास्टिंगच्या आधारे सर्व तीसही मतदान केंद्रांचे लाइव्ह मॉनिटरिंग केले.
चुरशीच्या या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येंकर, काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात आणि गोसुंमचे सुभाष वेलिंगकर, आम आदमी पक्षाचे वाल्मिकी नायक अन्य दोन अपक्ष उमेदवार दिलीप घाडी व विजय मोरे हे रिंगणात आहेत. भाजपा, काँग्रेस आणि गोसुमं अशी तिहेरी लढत आहे. गेली २४ वर्षे हा मतदारसंघ भाजपाकडे आहे. मात्र या पोटनिवडणुकीत येथे भाजपाच्या अस्तित्त्वाचा तसेच सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजपा उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येंकर म्हणाले की, ‘ पर्रीकरांनी अखेरच्या दिवसात सकारात्मकतेचा दिलेला संदेश घेऊनच आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत.’ आपल्याला १0 हजारांहून अधिक मतें मिळतील, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसी उमेदवार बाबुश मोन्सेरात म्हणाले की, ‘यावेळी पणजीत बदल हा निश्चित आहे. नोकऱ्या आणि विकासाचा मुद्दा घेऊन मी लोकांसमोर गेलो आणि मला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. पुढील दोन वर्षे मी लोकांबरोबर आणि लोकांसाठी प्रत्यक्ष फिल्डवर करणार आहे.’
गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी ही लढत गोसुमं आणि काँग्रेस यांच्यामध्येच असल्याचा दावा करुन भाजपा तिसऱ्या स्थानी फेकला जाणार आहे आणि भाजपाच्या नाशाची ही नांदी असल्याचे सांगितले. आठ ते साडेआठ हजार मतें मला मिळतील आणि दोन ती अडीच हजारांच्या मताधिक्क्याने मी निवडून येईन. आम आदमी पक्षाचे उमेदवार वाल्मिकी नायक म्हणाले की, ‘ या पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान होईल, कारण लोकांना निषेध नोंदवायचा आहे आणि स्वच्छ राजकारण आणायचे आहे. या निवडणुकीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले परंतु कचरा समस्या, पिण्याचे पाणी, वीज, फूटपाथ या मुख्य मुद्यांवर कोणीच बोलले नाहीत. गेली तीन दिवस उर्वरित उमेदवारांची नाटके चालू आहेत.