१० दिवसांत 'इफ्फी'साठी सजणार राजधानी: मुख्यमंत्री; राज्य सरकार यंदा २६ कोटी खर्च करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2024 09:19 AM2024-11-05T09:19:10+5:302024-11-05T09:19:42+5:30
५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा राज्यातील जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा, यासाठी विविध शहरात सार्वजनिक ठिकाणी चित्रपट दाखविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: इफ्फीची तयारी अंतिम टप्प्यात असून येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील. राज्य सरकार यंदा २६ कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी दिली. तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक बोलावली होती. मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, पोलिस महासंचालक आलोक कुमार व इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्य सरकारने २२ नोव्हेंबर रोजी ईएसजी ते कला अकादमी चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन केले आहे. शिगमोत्सव व कार्निवलमध्ये विजेते ठरलेले चित्ररथ संघ मिरवणुकीत सहभागी होतील. एकूण सहा चित्ररथ असतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. किनारपट्टीवरील या राज्यातील प्रमुख उत्सवांचे प्रदर्शन केले जाईल.
मिरामार किनारा, वागातोर येथील हेलिपॅडकडील पार्किंगची खुली जागा तसेच मडगावच्या रवींद्र भवनात लोकांना मोफत सिनेमे दाखवले जातील. १८ रोजी तयारीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा बैठक घेतली जाईल, असे सावंत म्हणाले.
सार्वजनिक ठिकाणी दाखविणार चित्रपट
५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा राज्यातील जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा, यासाठी विविध शहरात सार्वजनिक ठिकाणी चित्रपट दाखविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात मिरामार किनाऱ्यासह वागातोर येथील हेलिपॅडकडील पार्किंगची खुली जागा तसेच मडगावच्या रवींद्र भवनात लोकांना मोफत चित्रपट दाखवले जाणार आहेत.
३६५९ जणांनी केली नोंदणी
- आजपर्यंत ३६५९ जणांनी इफ्फीसाठी प्रतिनिधी म्हणून ऑनलाइन नोंदणी केली आहे.
- येत्या दहा-बारा दिवसांत नोंदणीची संख्या वाढेल.
- दरवर्षी, या महोत्सवासाठी सुमारे ८ हजार प्रतिनिधी ऑनलाइन नोंदणी करतात, असे सावंत पुढे म्हणाले.