पणजी ते वास्को प्रवास आता अवघ्या २० मिनिटांत; PM मोदींकडून आनंद व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 12:54 PM2023-03-06T12:54:19+5:302023-03-06T12:55:48+5:30
पूर्वी हे अंतर ३२ किलोमीटर होते व ४५ मिनिटे या प्रवासासाठी लागायची.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: राष्ट्रीय जलमार्ग क्र. ६८ मुळे पणजी ते वास्को अंतर ९ किलोमीटरने कमी झाले असून, हे अंतर आता बोटीने केवळ २० मिनिटांत कापता येईल. पूर्वी हे अंतर ३२ किलोमीटर होते व ४५ मिनिटे या प्रवासासाठी लागायची.
केंद्रीय जहाज उद्योग तथा बंदर व जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ही माहिती देणारे ट्विट केले आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी या ट्रीटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना यामुळे स्थानिक लोकांना दिलासा व पर्यटनाला चालना मिळेल, असे म्हटले आहे.
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी याबद्दल आनंद व्यक्त करताना स्थानिक लोकांसाठी ही बाब फार दिलासादायक असल्याचे नमूद करून पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल, असे म्हटले आहे. रस्ता वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलमार्गांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला जात आहे.
गोव्यातील प्रमुख नद्यांमधील गाळ उपसून जलमार्ग सुकर करण्यासाठी ११५ कोटी रुपये खर्चून कामे हाती घेण्यात आली. पणजी - वास्को जलमार्ग सुकर करण्याबरोबरच हळदोणा, बेती, बिठ्ठोण, खोर्जुवे, पोंबुर्फा, दुर्भाट, जुने गोवे, चोडण, रायबंदर येथे बोटींसाठी टर्मिनल उभारण्यासाठी केंद्रीय जलमार्ग मंत्रालयाने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) याआधीच तयार केलेला आहे. नऊ ठिकाणी जेटी बांधल्या जातील त्यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च येईल.
दरम्यान, बायणा किनाऱ्यावर दृष्टी मरिन कंपनीने तरंगती जेटी बांधली आहे. जी अद्ययावत, पर्यावरणाभिमुख तसेच निखळून पुन्हा जोडता येईल, अशी असल्याचा दावा केला जात आहे. दृष्टी कंपनीने पणजी वास्को फेरीसेवाही सुरू केली आहे, असेही सांगण्यात आले.
कालांतराने रो-रो सेवा : केंद्रीय राज्यमंत्री नाईक
मंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, क्रूझ बोटींसाठी टर्मिनल तसेच इतर सुविधा उभारण्यासाठी एमपीटीला आवश्यक तो निधी आम्ही दिलेला आहे. वास्को ते दोनापावल रो-रो सेवाही सुरु होईल. जेणेकरून मोठ्या बोटींच्या माध्यमातून वाहनांचीही ने- आण करता येईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"