कामावरुन काढून टाकलेल्या ड्युरालाईन कंपनीच्या कामगारांकडून पणजीत निदर्शने
By पूजा प्रभूगावकर | Published: June 18, 2024 12:12 PM2024-06-18T12:12:02+5:302024-06-18T12:12:24+5:30
या कामगारांना १ एप्रिल पासून कुठलीही कल्पना न देता कामावरुन काढून टाकल्याचा आरोप आहे.
पणजी: वेर्णा येथील ड्युरालाईन कंपनीने सेवेतून अचानक काढून टाकलेल्या ४९ कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे या मागणीसाठी आयटकने पणजी येथील आझाद मैदानावर मंगळवारी निदर्शने केली. जो पर्यंत या कामगारांचा प्रश्न मिटत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवू असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी सेवेतून कमी केलेले सर्व ४९ कामगारांनी उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी केली. या कामगारांना १ एप्रिल पासून कुठलीही कल्पना न देता कामावरुन काढून टाकल्याचा आरोप आहे. कंपनीने पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी हे कामगार वेर्णा येथील ड्युरालाईन कंपनीच्या गेट बाहेर आंदोलन करीत आहेत.
ड्युरालाईन कंपनी ही अमेरीकन कंपनी असून ती मागील ३० वर्षापासून गोव्यात कार्यरत आहे. ज्या कामगारांना कामावरुन काढून टाकले ते अनेक वर्षापासून काम करीत आहेत. या कामगारांना ३१ मार्च रोजी मध्यरात्री मोबाईलवर मॅसेज पाठवून उद्यापासून कामावर येऊ नये, बॅंक खात्यात सेटलमेंटची रक्कम जमा झाल्याचे कळवल्याचा आरोप आयटक नेत्यांनी केला.