गोव्यात होणारा पन्नासावा इफ्फी महोत्सव दोनापावलमधील नव्या संकुलात, मुख्यमंत्री पर्रीकर यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 06:37 PM2017-09-13T18:37:23+5:302017-09-13T18:38:22+5:30
गोव्यातील दोनापावल येथे पाच ते सहा हजार प्रेक्षक क्षमतेचे प्रशस्त कन्व्हेन्शन सेंटर आणि एक हजार खोल्यांचे हाॅटेल व त्याचसोबत दहा स्क्रीन्स असलेल्या मल्टिप्लेक्सचे बांधकाम करण्यात येईल.
पणजी, दि. 13 - गोव्यातील दोनापावल येथे पाच ते सहा हजार प्रेक्षक क्षमतेचे प्रशस्त कन्व्हेन्शन सेंटर आणि एक हजार खोल्यांचे हाॅटेल व त्याचसोबत दहा स्क्रीन्स असलेल्या मल्टिप्लेक्सचे बांधकाम करण्यात येईल. 2019 साली पन्नासावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) ह्या नव्या भव्य संकुलामध्ये आयोजित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे बुधवारी जाहीर केले.
गोवा मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. त्या बैठकीत नव्या इफ्फी संकुलाविषयी चर्चा झाली. गोवा मनोरंजन संस्थेने या संकुलाचे बांधकाम करून घ्यावे असे गेल्यावर्षी ठरले होते. पण बुधवारी मंत्रिमंडळाने हे काम गोवा आर्थिक विकास महामंडळ( ईडीसी )व आयटीजीने मिळून करावे असे ठरविले आहे. ईडीसीकडून एसपीव्हीची स्थापना करून पीपीपी तत्वावर कन्व्हेन्शन सेंटर आणि एकूण इफ्फी संकुलाचे काम करून घेतले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एकूण दोन टप्प्यांत काम केले जाईल. पहिल्या टप्प्यात दहा स्क्रीनचा मल्टिप्लेक्स आणि कन्व्हेन्शन सेंटर व दुसऱ्या टप्प्यांत हाॅटेल बांधले जाईल. जिथे पूर्वी आयटी हॅबीटेट येणार होते, त्या जागेत इफ्फी संकुल साकारेल. आयटी हॅबीटेट प्रकल्प पूर्वीच रद्द झाला आहे. पणजीपासून तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये दोनापावलची ही जागा आहे.