पंकज नार्वेकरने रचला इतिहास; माउंट एव्हरेस्ट सर करणारे ठरले पहिले गोमंतकीय
By समीर नाईक | Published: May 25, 2024 08:50 PM2024-05-25T20:50:03+5:302024-05-25T20:50:56+5:30
पंकज नार्वेकर हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गोमंतकीय गिर्यारोहक ठरले आहेत
पणजी: पर्वरी येथील ४१ वर्षीय पंकज नार्वेकर यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करत नवा इतिहास रचला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता असलेले पंकज नार्वेकर हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गोमंतकीय गिर्यारोहक ठरले आहेत. नार्वेकर यांनी २१ मे रोजी सकाळी ५:३० वाजता यशस्वीरित्या एव्हरेस्ट सर केला.
गेल्या कित्येक वर्षांपासून ते गिर्यारोहन करत आहेत. शिखर त्यांना नेहमीच खुनावत होते. २०१५ वर्षापासून त्यानी माउंट कामेट (७७५० मी), माउंट कुन (७०७७ मी), माउंट कांग यात्से-१ आणि २ (६४०० आणि ६२५० मी) इत्यादी महत्वाची शिखरे यशस्वीपणे सर केली आहेत. याच अनुभवाच्या बळावर अखेर त्यांनी गिर्यारोहणमधील प्रतिष्ठीत मानला जाणारा माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले. यापूर्वी अशी किमया कुठल्याच गोमंतकीयाने केले नव्हती.
पंकज नार्वेकर हे राज्यातील प्रसिध्द युवा गिर्यारोहण गुंजन नार्वेकर यांचे वडील आहेत. गुंजन नार्वेकर हीने अलीकडेच अनेक गिर्यारोहणाचे विक्रम मोडले आहेत. पंकज आणि गुंजन या बाप लेकीने यापूर्वी एव्हरेस्ट बेस कँपपर्यंत मजल मारली होती. एव्हरेस्ट बेस कँपपर्यंत पोहचणारी सर्वात युवा गोमंतकीय म्हणून गुंजनचे नाव घेतले जाते. गुंजनेने देखील १२ वर्षाची असताना तुंगनाथ, चंद्रशीला, व केदारनाथ ट्रॅक पूर्ण केला होता.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
"पंकज नार्वेकर हे माऊंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गोमंतकीय बनले आहे. त्यांच्या या कामगिरीने गोव्यासाठी अभिमानस्पद आहे. पंकज नार्वेकर यांचे या कामगिरीसाठी अभिनंदन, तसेच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यांनी ही जी एव्हरेस्ट सर करण्याची किमया साधली आहे, ही निश्चितच भविष्यात राज्यातील युवा गिर्यारोहनांकरता प्रेरणादायी ठरणार आहे," असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन करण्यासाठी लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.