'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'; जीवनविद्या मिशनचे अलौकिक कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 08:00 AM2024-10-21T08:00:07+5:302024-10-21T08:01:18+5:30

ऋषीमुनींचे तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, सद्गुरूंना त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, सखोल चिंतन यांच्या मिलनातून जीवनविद्या साकार झाली.

paranormal work of sadguru vamanrao pai jeevan vidya mission | 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'; जीवनविद्या मिशनचे अलौकिक कार्य

'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'; जीवनविद्या मिशनचे अलौकिक कार्य

- प्रल्हाद वामनराव पै.

ऋषीमुनींचे तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, सद्गुरूंना त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, सखोल चिंतन यांच्या मिलनातून जीवनविद्या साकार झाली. जीवनविद्या तत्त्वज्ञान धर्मातीत, वैश्विक व शाश्वत आहे. जीवनविद्या हे संपूर्ण 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या सिद्धांताभोवती फिरते.

सध्याच्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणसाचे जीवन वेगवान व यांत्रिक बनले आहे. सर्वसामान्य माणूस सुख, शांती, समाधानाला पारखा झाला आहे. गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत किंवा अपयश आल्यास औदासिन्य येणे, दैववादाची कास धरणे यांचे प्रमाण समाजात वाढत आहे. अज्ञान व अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात दिसते. या सर्व समस्यांवर जीवनविद्येचा प्रकाश टाकून श्री सद्‌गुरूंनी समाजाला जीवन जगण्याची नवीन दिशा दाखविली आहे.

२०२३-२४ हे वर्ष श्री सद्‌गुरूंचे जन्मशताब्दी वर्ष आम्ही साजरे केले. "प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची" या श्री सद्‌गुरूंच्या शिकवणीनुसार भारतात आणि परदेशात अनेक प्रबोधने, घरोघरी आणि सामुदायिक रीतीने विश्व प्रार्थना जपयज्ञ मोठ्या प्रमाणात झाले. सदगुरू वामनराव पै हे माझे वडील. त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९२३ साली बलीप्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर गिरगावातील आंग्रेवाडीत झाला. मुंबईतील नामांकित रुईया कॉलेजमधून अर्थशास्त्रातून बी. ए. पदवी घेतली. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात उपसचिव पदावर नोकरी केली. ते १९८१ साली निवृत्त झाले.

आध्यात्मिक वाटचालीकरिता दादर येथील विवेकानंद वाचनालयात रामकृष्ण कामत यांचे 'नामजपाचे महत्त्व' हे पुस्तक त्यांनी वाचले. त्यांनी नामाचा अखंड छंदच घेतला. १९४८ साली श्रीगोंदा येथे प. पू. नाना महाराज गोंदेकर यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतला. दरम्यान स्पिरिच्युअल सेंटर, गावदेवी येथे दादासाहेब सबनीस यांनी प्रवचने होत असत. प्रवचन ऐकण्यास श्री सद्‌गुरू नियमित जायचे. एकदा हॉल श्रोतृवर्गाने तुडुंब भरला होता आणि दादासाहेब काही कारणाने येऊ शकले नाहीत. काहींनी सुचविले वामनराव पै यांनी प्रवचन करावे. लोकाग्रहामुळे ते व्यासपीठावर आले आणि त्यांनी प्रवचन केले. ते त्यांचे पहिले प्रवचन होते. श्रोते मात्र मंत्रमुग्ध झाले. पुढे त्यांची त्या सेंटरला नियमित प्रवचने सुरू झाली. थोर क्रांतिकारक मा. सेनापती बापट सद्‌गुरूंची प्रवचने ऐकण्यास नेहमी येत. १९५५ साली चिंचपोकळी येथील कामगार विभागात सद्‌गुरूंची प्रवचने सुरू झाली.

जीवनाच्या वाटचालीत सुख, समाधान, आनंद प्राप्त होण्यासाठी प्रपंच व परमार्थ या दोन्हीची नितांत आवश्यकता असते. प्रपंच व परमार्थ एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत. असमाधानाकडून समाधानाकडे, दुःखाकडून सुखाकडे व तिमिरातून प्रकाशाकडे नेणाऱ्या आणि प्रपंच व परमार्थ यांची सांगड घालून समतोल राखणाऱ्या विद्येला त्यांनी 'जीवनविद्या' नाव दिले. ऋषीमुनींचे तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, सद्‌गुरूंना त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, सखोल चिंतन यांच्या मीलनातून जीवनविद्या साकार झाली. जीवनविद्या तत्त्वज्ञान धर्मातीत, वैश्विक व शाश्वत आहे. जीवनविद्या हे संपूर्ण' तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या सिद्धांताभोवती फिरते. सद्‌गुरूंच्या प्रबोधनातून बोध घेऊन लाखो लोकांनी प्रयत्नवादाची कास धरली. त्यांच्या जीवनातील कर्मकांडे, अंधश्रद्धा गळून पडल्या. जीवनविद्या आचरणात आणणारी माणसे स्वतःबरोबर इतरांचा, समाजाचा, राष्ट्राचा विचार करू लागली. स्त्रियांचा सन्मान करू लागली. केवळ सद्‌गुरूंच्या प्रबोधनामुळे हजारो लोक व्यसनमुक्त झाले. विद्यार्थी अभ्यास करून चांगल्या गुणांनी पास होऊ लागले. आज हीच मुले देश परदेशात नोकऱ्या व्यवसाय करीत आहेत. अनेकांचे मोडायला आलेले संसार जीवनविद्या तत्त्वज्ञानाने सुरळीत चालत आहेत.

श्री सद्‌गुरू वंदनीय तर आहेतच परंतु आचरणीयदेखील आहेत. सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्यांनी नोकरी केली, संसार केला. आम्ही दोन भावंडे मी आणि माझी बहीण मालन, आम्हाला सुसंस्कार आणि उच्चशिक्षण दिले. जे जे सांगितले ते स्वतः प्रथम आचरण केले. Love, work and bless all ही त्यांची शिकवण. माणसाने त्याच्या वाट्याला आलेले समाज उपयुक्त काम आवडीने, प्रेमाने, कौशल्याने आणि प्रामाणिकपणे कसे करावे यावर ते मार्गदर्शन करीत असत. 
 

Web Title: paranormal work of sadguru vamanrao pai jeevan vidya mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.