गोव्यातील पालकांचा पुण्यात घर खरेदीकडे कल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 04:26 PM2017-10-04T16:26:31+5:302017-10-04T16:27:47+5:30
गोव्यातील असंख्य मुले पुणे येथे उच्च शिक्षणासाठी असल्याने पालकांचा पुणे येथे घर खरेदीकडे मोठा कल आहे. पुणे येथील बिल्डर गार्डियन ग्रुपचे संचालक उदय जाधव म्हणाले की कोथरूड, सिंहगड रोड, सातारा रोड, बाणेर रोड आदी भागात गोव्यातील लोकांचा सदनिका खरेदी करण्याचा कल जास्त आहे.
पणजी - गोव्यातील असंख्य मुले पुणे येथे उच्च शिक्षणासाठी असल्याने पालकांचा पुणे येथे घर खरेदीकडे मोठा कल आहे.
पुणे येथील बिल्डर गार्डियन ग्रुपचे संचालक उदय जाधव म्हणाले की कोथरूड, सिंहगड रोड, सातारा रोड, बाणेर रोड आदी भागात गोव्यातील लोकांचा सदनिका खरेदी करण्याचा कल जास्त आहे. कारण या ठिकाणहून गोव्यात येण्यासाठी लवकर एक्झीट मिळते. गोव्यातील अनेक लोक पुण्यामध्ये प्रॉपर्टीत गुंतवणूक करू लागले आहेत.जाधव म्हणाले की, सिंधुदुर्ग कोल्हापूर या ठिकाणचे पालकही पुण्यात घर किंवा सदनिका शोधतात. त्यासाठी आमच्याकडे अनेकजण चौकशी करतात .
मुले दहावी-बारावीत पोचण्याआधीच पुण्यात घर खरेदीसाठी चौकशी सुरू होते. पालकांना साधारणपणे बुकिंग केल्यानंतर दोन वर्षांत घराचा किंवा सदनिकचा ताबा हवा असतो. अनेकजण हिंजेवाडी,खराडी आधी आयटी परिसराची निवड करतात. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय उपचारांसाठीही पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे . साधारणपणे प्रत्येक महिन्याला 12000 कुटुंबे पुण्यात स्थलांतरित होतात,असे ते म्हणाले.
गोव्याच्या बाबतीत ते म्हणाले महाराष्ट्राची भाषा येथील संस्कृती गोवेकर मंडळी लवकर आत्मसात करतात आणि पुण्याच्या वातावरणात मिसळून जातात. सिंधुदुर्ग-कोल्हापूर किंवा गोव्यात उच्च शिक्षणाच्या संधी खूप मर्यादित आहेत पुण्यात आयटी तसेच ऑटोमोबाइल क्षेत्रात भरपूर वाव आहे येथे उच्च शिक्षण घेतल्यानंतर मुले नोकरी-व्यवसायासाठी पुण्यातच स्थायिक होतात त्यांच्यासाठी पालक गुंतवणुकीची तयारी करतात. वैद्यकीय उपचारांच्या बाबतीतही पुण्यात अनेक सोयी आहेत. मूत्रपिंड रोपण, गुडघा रोपण आदी शस्त्रक्रिया किफायतशीर दरात येथे होतात. दरम्यान, गोव्यातून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या रविवारी नेहमीच फुल्ल जात असतात. विद्यार्थी आठवड्याच्या सुट्टीत गोव्यात येतात आणि रविवारी परततात.