परिमल राय गोव्याचे नवे मुख्य सचिव,धर्मेंद्र शर्मांची दिल्लीला बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 01:56 PM2018-12-17T13:56:43+5:302018-12-17T13:56:50+5:30
गोव्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांची नवी दिल्लीला बदली झाली असून आयएएस अधिकारी परिमल राय यांना गोव्यात मुख्य सचिवपदी पाठवण्यात आले आहे.
पणजी : गोव्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांची नवी दिल्लीला बदली झाली असून आयएएस अधिकारी परिमल राय यांना गोव्यात मुख्य सचिवपदी पाठवण्यात आले आहे. राय यांनी यापूर्वी गोव्याच्या प्रशासनात प्रधान सचिव म्हणून काम केले आहे. परिमल राय हे १९८५ बॅचचे अॅग्मू केडरचे आयएएस अधिकारी आहेत. संघप्रदेश प्रशासकांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. ३१ डिसेंबर २0१६ रोजी आर. के. श्रीवास्तव हे सेवानिवृत्त झाल्यानंतर धर्मेंद्र शर्मा यांच्याकडे मुख्य सचिवपदाचा ताबा देण्यात आला होता. त्याआधी शर्मा हे बांधकाम खात्याचे तसेच वाहतूक, दक्षता आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे प्रधान सचिव म्हणून काम पहात होते. परिमल राय यांना गोवा नवीन नाही. येथे बराच काळ काम करुन तीन वर्षांपूर्वी त्यांची दिल्लीला बदली झाली होती.
राय यांनी संघप्रदेश प्रशासकांचे सल्लागार म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे. ते अनुभवी व ज्येष्ठ अधिकारी आहेत. गोवाही आधी संघप्रदेश होता. राय यांच्या या अनुभवाचा फायदा गोव्याला मिळणार आहे. संघप्रदेश प्रशासकाला धोरणात्मक निर्णय तसेच दैनंदिन प्रशासनाबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन करण्याचे काम केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमलेला सल्लागार अधिकारी करीत असतो. प्रशासकाचे सर्व वित्तीय अधिकारही या पदावरील अधिका-याला असतात. दरम्यान, कार्मिक खात्याच्या अधिकाºयाशी संपर्क साधला असता शर्मा यांना गोव्याच्या सेवेतून मोकळीक देण्यासंबंधीची फाइल सरकारला पाठवली जाईल, असे सांगण्यात आले.