पर्रीकर दिल्लीतील एम्समध्ये दाखल, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 05:58 PM2018-09-15T17:58:20+5:302018-09-15T17:59:12+5:30
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे डॉ. प्रमोद गर्ग यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांना तपासत असल्याची माहिती सुत्रंकडून मिळाली.
पणजी : तीन दिवस कांदोळीच्या खासगी इस्पितळात उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना शनिवारी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टीटय़ूट ऑफ मेडीकल सायन्स (एम्स) ह्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तिथे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे डॉ. प्रमोद गर्ग यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांना तपासत असल्याची माहिती सुत्रंकडून मिळाली.
पर्रीकर यांचे शरीर फक्त पातळ पदार्थ स्वीकारत आहे. अन्य पदार्थ पचत नाहीत, अशी तक्रार असल्याची माहिती मिळते. अगोदर त्यांनी कांदोळी येथील इस्पितळात उपचार घेतले पण फार सुधारणा झाली नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी पर्रीकर यांनी शुक्रवारी संपर्क साधला होता. शहा यांनी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकर यांना दिल्लीतील एम्स संस्थेत दाखल व्हावे, असा सल्ला दिला होता. त्यानुसार एम्स संस्थेत जाण्याचा निर्णय पर्रीकर यांनी शुक्रवारी रात्री घेतला. पर्रीकर यांच्यासाठी केंद्र सरकारने विशेष विमानाची व्यवस्था केली. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता हे विमान गोव्याहून दिल्लीला निघाले. दुपार पर्यंत पर्रीकर एम्स इस्पितळात दाखल झाले. पर्रीकर यांच्या एम्समध्ये विविध चाचण्या केल्या जात आहेत.
एम्समधील जुन्या खासगी वॉर्डमध्ये ते असल्याचे सांगण्यात आले. पर्रीकर हे गेले काही महिने सातत्याने विविध इस्पितळांत उपचार घेत असून तीनवेळा ते अमेरिकेला जाऊन आले. दोनवेळा ते मुंबईतील इस्पितळात दाखल झाले होते. गोव्यात कधी गोमेकॉ इस्पितळात तर कधी खासगी इस्पितळात त्यांना दाखल व्हावे लागले. त्यांच्या आरोग्याविषयी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही चिंता आहे. पर्रीकर बरे होऊन यावेत, अशी प्रार्थना भाजपचे कार्यकर्ते करत आहेत.
मंत्र्यांना अतिरिक्त खाती मिळणार
पर्रीकर एम्समध्ये दाखल झाल्यानंतर गोव्यातील राजकीय क्षेत्रात विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. भाजपचे आमदार व उपसभापती मायकल लोबो यांच्या मते पर्रीकर हे त्यांच्याकडील महत्त्वाची अतिरिक्त खाती सर्व मंत्र्यांमध्ये वितरित करणार आहेत. पर्रीकर यांनी शनिवारी आपल्याला व सभापती प्रमोद सावंत यांना तसे सांगितले असल्याचे लोबो म्हणाले. लोबो यांनी जाहीरपणो तसे विधान केल्याने अन्य सगळे मंत्री आता आपल्याला कोणते अतिरिक्त खाते मिळेल याकडे लक्ष ठेवून आहेत.