पर्रीकरांना दिल्लीचे साकडे!
By admin | Published: November 5, 2014 02:14 AM2014-11-05T02:14:20+5:302014-11-05T02:20:18+5:30
मुख्यमंत्री आज दिल्लीत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उमटवली मोहोर!
नवी दिल्ली/पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीत बोलविण्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. पर्रीकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून बुधवारी नवी दिल्लीला निघत आहेत.
याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण बुधवारी दुपारी नवी दिल्लीला रवाना होणार हे खरे आहे, असे सांगितले. केंद्रात मोठी जबाबदारी देण्यासंबंधी चर्चेसाठी ही बैठक आहे का, असे विचारले असता त्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसल्याचे ते म्हणाले; परंतु आपली मात्र काही महत्त्वाची कामे तिथे असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळात पर्रीकर यांचे ज्ञान आणि अनुभव उपयोगात आणण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. सध्या बऱ्याच मंत्र्यांकडे दोन किंवा तीन खाती आहेत. पर्रीकर यांनी ३० आॅक्टोबर रोजी मोदींची भेट घेतली, त्या वेळी त्यांच्या सहभागाचे संकेत मिळाले. अरुण जेटली सध्या अर्थमंत्रालयाच्या जबाबदारीत व्यग्र आहेत. त्यांच्याकडील संरक्षण खाते पर्रीकर यांना दिले जाईल. पर्रीकर हे दिल्लीहूनच गोव्याच्या कारभाराकडे लक्ष ठेवणार असून नव्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करतील. पर्रीकर यांनी या प्रस्तावावर विचार करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला. मोदी १२ नोव्हेंबर रोजी म्यान्मार, आॅस्ट्रेलिया आणि फिजीच्या अधिकृत भेटीवर जात आहेत, तत्पूर्वीच हा अंक पार पडेल.
नागपूरहून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट करून त्यात राज्यांमधील काही महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश करावा, यासाठी संघाने एक राजकीय नीती तयार केली आहे. या योजनेनुसार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह राजस्थानच्या मुख्यमंत्री विजयाराजे शिंदे यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी देणे घाटत आहे. दिल्लीतील एकूणच मंत्रिमंडळाची फेररचना लवकरच केली जाणार असून संरक्षण मंत्रालयांसह बरेच मोठे बदल त्यात अभिप्रेत आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आजपर्यंत दिल्लीचे आपल्याला आमंत्रण आल्याचा इन्कार केला असला, तरी संरक्षण मंत्रालयाची स्वतंत्र जबाबदारी मिळत असेल तर त्यांनी ती स्वीकारावी, असा मतप्रवाह गोव्यातही निर्माण झाला आहे. संरक्षणमंत्रिपद हे सर्वोच्च पद तर आहेच, शिवाय पंतप्रधानांसह अन्य तिघांच्या बनलेल्या सर्वोच्च मंत्रिमंडळाचेही ते सदस्य राहाणार आहेत. हे मंडळ सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार बाळगते. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे, पर्रीकर दिल्लीला जाण्यास तयार असतील तर त्यांना त्यांच्या राज्यात नवीन मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार देण्यासही भाजपा तयार झाला आहे.
(विशेष प्रतिनिधी)