पर्रीकरांनी एकेकाळी चालविले पवईच्या आयआयटीतील मेस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 07:58 PM2019-03-18T19:58:16+5:302019-03-18T20:01:04+5:30
एकदा तर मेस कामगारांचा संपही त्यांनी मोडून काढला.
पणजी : गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुंबईत पवई येथील आयटीमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थी दशेत आयआयटीचे मेसही बऱ्यापैकी चालवले आणि याचे उदाहरण ते आपल्या भाषणांमधून अनेकदा देत असत. आयआयटीच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मेसमध्ये जेवण, नाष्टा माफक दरात मिळावा, असे त्यांना नेहमी वाटायचे. एकदा तर मेस कामगारांचा संपही त्यांनी मोडून काढला.
आयआयटी झालेले पहिले मुख्यमंत्री होत. चारवेळा ते मुख्यमंत्री बनले. १९७८ च्या सुमारास पर्रीकर आयआयटीमध्ये होते. पवई, आयआयटीमध्ये त्यांनी मेटलर्जिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतले. तरुण वयातच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात रुजू झाले आणि अल्पावधीतच संघात मुख्य शिक्षकही बनले. आयआयटी झाल्यानंतर ते पुन: संघाच्या कार्यासाठी जोमाने कामाला लागले.
त्यामुळेच ते शिस्तीच्या बाबतीत अत्यंत कडक होते. एकदा मेस कामगार संपावर गेले तेव्हा सहकारी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी जेवण बनविले. स्वयंपाकासाठी लागणारे सर्व साहित्य, अंडी, भाजीपाला ते स्वत: बाजारात जाऊन खरेदी करीत असत. हिशोबाच्या बाबतीत ते कडक होते. मेसच्या सचिवपदाच्या कारकिर्दित ते चोख हिशोब ठेवत असत. एकूणच मेसचे बिल कमी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते.
पर्रीकर जाहीर सभांमध्ये असो किंवा विधानसभेतील भाषणात या गोष्टीचा आवर्जुन उल्लेख करीत असत. आयआयटीच्या मेसच्या प्रकरणातून आपल्याला राजकारणाचे धडे मिळाले, असेही ते आवर्जून सांगत असत. २0१७ साली पर्रीकर यांना पवई आयआयटीमध्ये पदवीदान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नेण्यात आले तेथे त्यांनी भाषण करताना आयआयटी पदवीधरांना सामाजिक आणि विकास क्षेत्रात येण्याचे आवाहन केले.
राफेलचा पहिला बळी; पर्रीकरांना श्रद्धांजली वाहताना जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान