पर्रीकरांनी गोव्यात परतावे - तेंडुलकर
By admin | Published: January 25, 2017 03:38 AM2017-01-25T03:38:36+5:302017-01-25T03:38:36+5:30
राज्यात पुढील सरकार मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखाली काम करील, असे संकेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्यानंतर
पणजी : राज्यात पुढील सरकार मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखाली काम करील, असे संकेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्यानंतर काही तासांतच प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही पर्रीकर यांना गोव्यात परत आणले जावे, अशी लोकांची इच्छा असल्याचे म्हटले आहे.
तेंडुलकर म्हणाले की, पर्रीकरांचा लोकसंपर्क दांडगा आहे, त्यामुळेच त्यांना परत गोव्यात आणावे अशी मागणी आहे. परंतु त्याबाबतचा निर्णय निवडून येणारे भाजपाचे आमदारच एकत्रितपणे घेणार आहेत.
पर्रीकर हे मुख्यमंत्रीपदी नसले तरी गोव्याचा कारभार तेच हाताळतील, असे प्रतिपादन शहा यांनी सोमवारी गोवा भेटीवर असताना केले होते. गोव्यातील लोकांची मागणी व अपेक्षा यावरून शहा यांनी वरील विधान केले असावे, असे तेंडुलकर म्हणाले. सध्या पर्रीकर, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे पक्षाच्या प्रचाराची धुरा वाहत आहेत, असे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, आमदारच नेता ठरवतील आणि हा निर्णय निवडणुकीनंतरच होणार आहे.
संघाबद्दल विचारले असता तेंडुलकर म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक कधीच राजकारणात हस्तक्षेप करीत नाहीत, त्यांचा भाजपाला आशीर्वाद आहे आणि या निवडणुकीतही ते आमच्याबरोबरच आहेत. गोवा सुरक्षा मंच पक्ष स्थापन झाला तेव्हा पुढील सरकार आमचेच असेल, असा दावा ते करीत होते. आता केवळ चार जागा हा पक्ष लढवित आहे. तथापि एकही जागा हा पक्ष जिंकू शकणार नाही. त्यांच्यामुळे भाजपावर कोणताही परिणाम होणार नाही. केडरचे लोक आमच्याबरोबर आहेत, असा दावा तेंडुलकर यांनी केला.
शुक्रवारी २७ जानेवारीला भाजपाचा जाहीरनामा घोषित होणार आहे. गेल्या पाच वर्षांचा अनुभव जाहीरनामा तयार करण्यासाठी कामी आला. काही अपूर्ण गोष्टी आहेत त्यांचा अंतर्भाव पुन: केला जाणार असून ते प्रश्न मार्गी लावू. २0१२ च्या जाहीरनाम्यातील ९0 टक्के आश्वासने पूर्ण केल्याचा दावा तेंडुलकर यांनी केला. (प्रतिनिधी)