पर्रीकरांची धडक, कर्मचाऱ्यांना धडकी!
By admin | Published: April 14, 2017 02:41 AM2017-04-14T02:41:39+5:302017-04-14T02:46:25+5:30
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी सकाळपासून विविध महत्त्वाच्या खात्यांना व महामंडळांच्या कार्यालयांना आकस्मिक
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी सकाळपासून विविध महत्त्वाच्या खात्यांना व महामंडळांच्या कार्यालयांना आकस्मिक भेटी दिल्या व काही सरकारी कार्यालयांमधील अनास्थेचा अनुभव घेतला. मुख्यमंत्री कार्यालयात आले असल्याचे पाहून अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ आणि तारांबळ उडाली.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपण येणार असल्याची कल्पना खातेप्रमुखांनाही दिली नव्हती. ते खासगी वाहनाने गेले आणि त्यांनी प्रथम पोलीस मुख्यालय गाठले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच शहर पोलीस स्थानकासही मुख्यमंत्र्यांनी अचानक भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी पोलीस मुख्यालयातील कॅन्टिनमध्ये चहाही घेतला.
नेवगीनगर येथील गोवा हस्तकला विकास महामंडळाच्या मुख्यालयाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिथे कोण उपस्थित आहेत व कोण गैरहजर आहेत हे जाणून घेतले. व्यवस्थापकीय संचालक व लेखा अधिकारी उपस्थित नव्हते. त्यापैकी लेखा अधिकाऱ्याला फोन करून मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले. मला मलनिस्सारण महामंडळाचाही अतिरिक्त ताबा असल्यामुळे तिथेही जावे लागले, असे स्पष्टीकरण त्या अधिकाऱ्याने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सकाळी नऊ वाजल्यापासून दिवसभर मुख्यमंत्री आकस्मिकपणे अनेक कार्यालयांमध्ये जाऊन आले.
(खास प्रतिनिधी)