‘लोकसभे’साठी पर्रीकरपुत्र उत्पल एनडीएसोबत; विधानसभा निवडणूक अपक्ष लढली होती
By किशोर कुबल | Published: October 13, 2023 01:02 PM2023-10-13T13:02:59+5:302023-10-13T13:08:04+5:30
उत्पल यांनी प्रसार माध्यमांकडे बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहेत.
किशोर कुबल
पणजी : गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पणजीत तिकीट न दिल्याने बंड करुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले उत्पल पर्रीकर हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मात्र एनडीएसोबत राहणार आहेत. उत्पल यांनी प्रसार माध्यमांकडे बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहेत. ते म्हणाले की,‘लोकसभा निवडणुकीत माझा सहभाग निश्चितच असणार आहे. माझी भूमिका स्पष्ट असून २०१४ पासून लोकसभेसाठी जे केले तेच यावेळी करणार आहे.’
उत्पल म्हणाले की,‘ विधानसभा निवडणुकीत माझी भूमिका वेगळी होती. निवडणुकीत पराभव झाला तरी मी लोकसंपर्क सोडलेला नाही. मी लोकांमध्येच आहे. पणजीच्या भल्यासाठी जे काही करायचे ते मी केले आणि यापुढेही करत राहणार.
उत्पल पर्रीकर हे माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र होत. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पणजी मतदारसंघातून रिंगणात उतरायचे होते. त्यासाठी त्यांनी पर्रीकर यांच्या जुन्या कार्यकर्त्यांना भेटून तयारीही केली होती. परंतु भाजप नेतृत्त्वाने बाबूश मोन्सेरात यांना तिकीट दिली. त्यामुळे उत्पल यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. बाबुश यांच्या नाकी दम आणताना त्यांना केवळ ७०० मतांनी पराभव पत्करावा लागला. लोकसभेसाठी मोदींच्या नेतृत्त्वाला त्यांचा पाठिंबा असेल हे स्पष्ट झाले.