पर्रीकरांची उद्या परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2017 08:52 PM2017-03-15T20:52:29+5:302017-03-15T20:52:29+5:30
हंगामी सभापती म्हणून सिद्धार्र्थ कुंकळयेकर यांना राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी बुधवारी राजभवनवर झालेल्या कार्यक्रमावेळी शपथ दिली.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 15 - हंगामी सभापती म्हणून सिद्धार्र्थ कुंकळयेकर यांना राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी बुधवारी राजभवनवर झालेल्या कार्यक्रमावेळी शपथ दिली. मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले मनोहर पर्रीकर गुरुवारी विधानसभेत आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करणार आहेत. काँग्रेस पक्षाकडे सतराच आमदार असल्याने विधानसभेत सरकारचा पराभव घडवून आणण्याचे सामर्थ्य विरोधकांकडे मुळीच राहिलेले नाही. कुंकळयेकर हे दोनवेळा पणजी मतदारसंघातून निवडून आले. ते पर्रीकर यांच्या अतिशय विश्वासातील मानले जातात.
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करा, असा आदेश पर्रीकर यांना दिला होता. त्यानुसार पर्रीकर बहुमत सिद्ध करण्यास सज्ज झाले आहेत. चाळीस सदस्यीय विधानसभेत एकूण बावीस आमदारांचे संख्याबळ पर्रीकर सरकारसोबत आहे. त्यात भाजपचे स्वत:चे तेरा आमदार आहेत. कुंकळयेकर यांची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय पर्रीकर यांनी घेतला. बुधवारी सकाळी त्याबाबतची फाईल सरकारने राज्यपालांकडे पाठवली व सायंकाळी राज्यपालांनी कुंकळयेकर यांना शपथ दिली. राजभवनवर त्या वेळी मुख्यमंत्री पर्रीकर उपस्थित होते. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी मंत्रालयात केबिनचा ताबा घेतला व काम सुरू केले. अन्य मंत्र्यांना अजून खाती मिळालेली नसल्याने त्यांनी केबिनचा ताबा घेतलेला नाही. बहुमत सिद्ध केल्यानंतर आपण खाते वाटपाची प्रक्रिया सुरू करीन, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी म्हटले आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बुधवारी सकाळी येथील काँग्रेस हाउसमध्ये बैठक झाली. पर्रीकर सरकार अल्पमतात कसे आणता येईल याविषयी चर्चा करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी दिगंबर कामत व विश्वजीत राणे या आमदारांकडे काँग्रेसने मगोपला व अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांना भाजपपासून अलग करून काँग्रेससोबत आणण्याची जबाबदारी सोपवली होती; पण मगोपने व खंवटे यांनीही काँग्रेसच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काँग्रेसनेही प्रयत्न सोडून देऊन विरोधी बाकांवर बसण्याची तयारी केली आहे. पर्रीकर सरकारचे आसन घट्ट झाल्यानंतर काँग्रेसमध्येच फूट पडू शकते व आमदार विश्वजीत राणे फुटू शकतात, अशी चर्चा आहे. विश्वजीत यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून आपल्या मनातील अस्वस्थता व्यक्त केली आहे. शिवाय काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व सरकार घडवून आणण्याबाबत कसे कमी पडले तेही विश्वजीतने गांधी यांना कळविले आहे. आपण त्या पत्रासाठी प्रतिसादाची प्रतीक्षा करत आहोत, असे विश्वजीत यांनी बुधवारी सांगितले. आपल्याला काँग्रेसचे काही आमदार एसएमएस पाठवून भाजपच्या बाजूने येण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. काँग्रेसच्या नेतृत्वावर आमदारांचा विश्वास राहिलेला नाही, असे पर्रीकर म्हणाले. दरम्यान, हंगामी सभापती म्हणून विधानसभेच्या ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता कुंकळयेकर यांची निवड करून भाजपप्रणित आघाडी सरकारने न्यायालयीन आदेशाचा भंग केला आहे, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व गोवा प्रभारी दिग्विजय सिंग यांनी केला आहे. ‘‘काँग्रेस पक्षाने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आगीशी खेळण्यासारखे होईल. हा प्रकार काँग्रेसच्या अंगलट येईल. सरकार भक्कम आहे. उलटपक्षी काँग्रेसचेच आमदार फुटू शकतात.’’
-मंत्री पांडुरंग मडकईकर