मिरामार येथे पर्रीकरांचे स्मारक उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 08:39 PM2019-03-20T20:39:43+5:302019-03-20T20:39:53+5:30
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक बुधवारी सकाळी झाली. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवावर मिरामार किनाऱ्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत तेथे त्यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाआधी ही बैठक घेण्यात आली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत उद्या गुरुवारी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. दरम्यान, विधानसभेत बहुमत सिध्द केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील दोन्ही जागा तसेच मांद्रे, शिरोडा व म्हापसा या विधानसभा पोटनिवडणुकीच्या तिन्ही जागा भाजप जिंकणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अपेक्षेप्रमाणे मते मिळाली. विधानसभा पोटनिवडणुकीनंतर आकडा आणखी वाढणार आहे.
विजय सरदेसाई आणि मगोपचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर या दोघांचीही उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करणारा आदेश बुधवारी सायंकाळी काढण्यात आला परंतु मंत्र्यांचे खातेवांटप मात्र लांबणीवर पडले आहे. मुख्यमंत्री दिल्लीहून परतल्यानंतरच खातेवांटप केले जाण्याची शक्यता आहे.