पर्रीकरांचा पेडण्यात दौरा
By admin | Published: February 12, 2017 01:29 AM2017-02-12T01:29:18+5:302017-02-12T01:29:29+5:30
पेडणे : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात पेडणेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र आर्लेकर यांच्या प्रचारात
पेडणे : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात पेडणेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र आर्लेकर यांच्या प्रचारात मतदारसंघात कोपरा बैठक घेताना मी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी येणार, असे अभिवचन निवडणूक काळात दिले होते. ११ फेब्रुवारी रोजी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांना भेटण्याचे त्यांनी मान्य केले होते. निवडणूक झाल्यावर कोणीही पुढची निवडणूक येईपर्यंत मतदारसंघात येत नाही. मात्र, मनोहर पर्रीकर यांनी दिलेला शब्द पाळला.
दि. ११ रोजी सकाळी १० पासून पर्रीकर यांनी कोरगाव येथून दौऱ्याला सुरुवात केली. कोरगाव येथे कामुलकर सभागृहात मुख्य कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन तिथल्या समस्या ऐकून घेतल्या. या वेळी पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर, भाजप पेडणे मंडळ प्रमुख कृष्णा गावडे, कोरगाव माजी सरपंच पंढरी आरोलकर, जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, अमित परब, पेडणे नगराध्यक्षा स्मिता कुडतरकर, नगरसेवक दीपक मांद्रेकर, सिद्धेश पेडणेकर, राम सावळ, चंद्रकांत सावळ देसाई, नगरसेवक गजानन सावळ देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला त्यांनी प्रत्येक मतदान केंद्रावरील आढावा घेतला. आर्लेकर यांना किती मताधिक्य प्राप्त करणार याचा प्रत्येक बुथप्रमुखाने अहवाल दिला.
कोरगाव येथील बैठकीत प्रामुख्याने कूळ-मुंडकार व रेतीचा विषय ऐरणीवर आला. या वेळी पर्रीकर यांनी जनहित समोर ठेवून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. पेडणे येथे चंद्रकांत सावळ देसाई यांच्या निवासस्थानी आयोजिलेल्या बैठकीत पालिका क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करून नियोजनबद्ध विकास करण्यात येईल. आगामी सरकारही भाजपचेच असणार त्यामुळे कुणीही घाबरण्याची गरज नाही. माझे पूर्ण लक्ष पेडणे मतदारसंघावर असून माझा पेडणे हा आवडता मतदारसंघ आहे. मी या मतदारसंघात परत परत येऊन समस्या सुटेपर्यंत पाठपुरावा करीन, असे त्यांनी सांगितले. या बैठकीत पालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालय उभारण्याविषयी मागणी झाली.
तोरसे येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत तोरसेचे सरपंच विलास शेट्ये, मोपा सरपंच रूपेश परब, माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर, कामिनी मावळणकर आदी उपस्थित होते. या ठिकाणी बेरोजगार समस्या, राष्ट्रीय महामार्गावरील बार यांवर बरीच चर्चा झाली. मोपा विमानतळ प्रकल्पावर स्थानिकांना रोजगाराच्या संधी द्याव्यात यासाठी निर्धार करण्यात आला. उपस्थित सरपंच, पंच आदींनी ग्राम पातळीवरील समस्यांची जंत्रीच पर्रीकरांसमोर मांडली. (प्रतिनिधी)