पर्रीकर प्रतिष्ठान मांडणार पर्रीकरांचे कार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 06:48 PM2019-12-02T18:48:06+5:302019-12-02T18:48:15+5:30

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान, त्यांची कार्यपद्धती, विचारसरणी, पुढील पिढीसमोर ठेवण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेले मनोहर पर्रीकर प्रतिष्ठान काम करणार आहे.

Parrikar's task of setting up a Parrikar establishment | पर्रीकर प्रतिष्ठान मांडणार पर्रीकरांचे कार्य

पर्रीकर प्रतिष्ठान मांडणार पर्रीकरांचे कार्य

Next

म्हापसा: दिवंगत नेते आधुनिक गोव्याचे शिल्पकार गणले जाणारे माजी संरक्षण मंत्री तसेच माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान, त्यांची कार्यपद्धती, विचारसरणी, पुढील पिढीसमोर ठेवण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेले मनोहर पर्रीकर प्रतिष्ठान काम करणार आहे. या प्रतिष्ठांनचे कार्य पर्रीकरांच्या जयंती दिनी १३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

आधुनिक गोव्याचे शिल्पकार म्हणून ओळख निर्माण केलेल्या पर्रीकर यांनी गोव्यातील राजकारणातील २० वर्षे गाजवली. गोव्यात भाजपाचे कार्य शून्यापासून ते सत्ता स्थापनेपर्यंत नेऊन हजारो कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. पर्रीकर यांनी त्यांचे नेतृत्व, सरकारातील पारदर्शकता, लोकाभिमुख सरकार, राज्याची गरज ओळखून नियोजित पद्धतीने सुविधा उभारल्या. त्यांनी उभारलेल्या सुविधा आज उत्कृष्ट नमुना ठरलेल्या आहेत. अनेक कल्याणकारी योजना तयार केल्या. त्यांनी केलेले कार्य या पुढेही सुरूच राहावे यासाठी प्रतिष्ठान काम करणार असल्याची माहिती दत्ता खोलकर यांनी दिली. प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी खोलकर यांच्या समवेत प्रतिष्ठानचे निमंत्रक रुपेश कामत, अखिल पर्रीकर, राजसिंग राणे, गुरुप्रसाद पावस्कर, सुखाजी नाईक हे मान्यवर उपस्थित होते.

१३ डिसेंबर रोजी प्रतिष्ठानचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती खोलकर यांनी दिली.  त्यानंतर १३ ते १५ डिसेंबरदरम्यान म्हापसा येथे व्याख्यानमालेचे पहिले पर्व आयोजित केले जाणार आहे. यात देशातील नामवंत वक्ते उपस्थित राहून पर्रीकरांच्या विविध पैलूवर मार्गदर्शन करणार आहेत. यात डॉ. अनीरबान गांगुली, अ‍ॅड. नलीन कोहली तसेच नितीन गोखले यांचा समावेश आहे.

शिक्षण हा पर्रीकरांचा अत्यंत आवडीचा विषय होता. गोव्यातून आयपीएस, आयएएस अधिकारी तयार व्हावेत, त्या पद्धतीचे शिक्षण देणा-या संस्था गोव्यात व्हाव्यात, दुर्बल घटकांना त्याचा लाभ प्राप्त व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पुढे नेण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने सरकारला योग्य ते सहकार्य केले जाणार असल्याचे खोलकर म्हणाले. पर्रीकरांवर आधारित काही पुस्तकेसुद्धा प्रकाशित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य, मंत्रालयात केलेली सुधारणा पुस्तक स्वरुपात मांडली जाणार आहेत.

१६ मार्च या त्यांच्या निधनाच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेले विविध लेख, संदेश आदी पुस्तक रुपात मांडले जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी केलेले कार्य सांगणारे सरकारातील विविध अधिका-यांचे लेख पुस्तक रुपात प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती खोलकर यांनी दिली. प्रतिष्ठानचे कार्य संपूर्ण गोव्यापर्यंत केंद्रित राहणार आहे. त्यासाठी विविध संस्थाच्या वतीने कार्य हाती घेतले जाणार आहे. सरकारला सहकार्य करण्याचे कामही प्रतिष्ठानच्या वतीने केले जाणार असल्याचे खोलकर म्हणाले.  

Web Title: Parrikar's task of setting up a Parrikar establishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.