पर्रीकरांची आज सत्वपरीक्षा
By admin | Published: March 16, 2017 03:43 AM2017-03-16T03:43:13+5:302017-03-16T03:43:13+5:30
हंगामी सभापती म्हणून सिद्धार्थ कुंकळयेकर यांना राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी बुधवारी राजभवनवर शपथ दिली. मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले मनोहर पर्रीकर
सदगुरू पाटील, पणजी
हंगामी सभापती म्हणून सिद्धार्थ कुंकळयेकर यांना राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी बुधवारी राजभवनवर शपथ दिली. मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले मनोहर पर्रीकर गुरुवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. काँग्रेस पक्षाकडे सतराच आमदार असल्याने विधानसभेत सरकारचा पराभव घडवून आणण्याचे सामर्थ्य विरोधकांकडे राहिलेले नाही.
कुंकळयेकर हे दोनवेळा पणजी मतदारसंघातून निवडून आले. ते पर्रीकर यांच्या अतिशय विश्वासातील मानले जातात. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करा, असा आदेश पर्रीकर यांना दिला होता. त्यानुसार पर्रीकर बहुमत सिद्ध करण्यास सज्ज झाले आहेत. चाळीस सदस्यीय विधानसभेत एकूण बावीस आमदारांचे संख्याबळ पर्रीकर सरकारसोबत आहे. त्यात भाजपाचे तेरा आमदार आहेत. कुंकळयेकर यांची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय पर्रीकर यांनी घेतला. बुधवारी सकाळी त्याची फाईल सरकारने राज्यपालांकडे पाठवली व सायंकाळी राज्यपालांनी कुंकळयेकर यांना शपथ दिली.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी मंत्रालयात केबिनचा ताबा घेतला व काम सुरू केले. बहुमत सिद्ध केल्यानंतर खाते वाटपाची प्रक्रिया सुरू करीन, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पर्रीकर सरकार अल्पमतात कसे आणता येईल याविषयी चर्चा झाली. दोन दिवसांपूर्वी दिगंबर कामत व विश्वजीत राणे यांच्याकडे मगोप व अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांना भाजपापासून अलग करून काँग्रेससोबत आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती; पण मगोप व खंवटे यांनीही काँग्रेसच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही. त्यातच आमदार विश्वजीत राणे फुटू शकतात, अशी चर्चा आहे. राणे यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून अस्वस्थता व्यक्त केली आहे. शिवाय काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व सरकार बनविण्यात कसे कमी पडले, तेही त्यांनी कळविले आहे. आपण त्या पत्रावर प्रतिसादाची प्रतीक्षा करत आहोत, असे राणे यांनी सांगितले.
हंगामी सभापती म्हणून विधानसभेच्या ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता कुंकळयेकर यांची निवड करून भाजपा सरकारने न्यायालयीन आदेशाचा भंग केल्याचा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व गोवा प्रभारी दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
म्हादईप्रश्नी राज्याच्या हिताला प्राधान्य - मनोहर पर्रीकर
म्हादईप्रश्नी गोव्याचे हित जपण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्यात येत आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यास प्राधान्य देणार असल्याचे मनोहर पर्रीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
२१ मार्चला लवादासमोर सुनावणी होणार की लवाद गुंडाळल्याचा निर्णय होणार ते पाहावे लागेल. याप्रश्नी गोव्याचे हित जपण्यासाठी आवश्यक पावले उचलणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.