भाजपच्या सोयीसाठी आरक्षणात पक्षपात
By admin | Published: September 26, 2015 03:23 AM2015-09-26T03:23:08+5:302015-09-26T03:26:32+5:30
पणजी : पालिका प्रभाग आरक्षणात सरकारने पक्षपात केला असून भाजप उमेदवारांना सोयीचे होईल अशीच रचना करण्यात आलेली आहे
पणजी : पालिका प्रभाग आरक्षणात सरकारने पक्षपात केला असून भाजप उमेदवारांना सोयीचे होईल अशीच रचना करण्यात आलेली आहे, असा आरोप प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा पत्रकार परिषदेत म्हणाले, भाजपच्या पायाखालची वाळू सरकत चालल्यानेच आरक्षणातही घोळ घातला गेला. गेल्या निवडणुकीत जो प्रभाग महिलांसाठी राखीव होता तो या वेळीही महिलांकरिताच राखीव ठेवला आहे. मुरगाव पालिकेच्या प्रभाग १७ मधील काही मतदारांची नावे तर प्रभाग २१ मध्ये घातली आहेत. कुटुंबातील काहींची नावे एका प्रभागात, तर काहींची दुसऱ्या प्रभागात घातली आहेत. म्हापसा पालिकेत प्रभाग ७ गेल्यावेळी महिलांकरिता राखीव होता, तो या वेळीही महिलांकरिता राखीव केला आहे. भाजप उमेदवारांच्या सोयीसाठीच हे षडयंत्र करण्यात आले असून सर्व काही सत्ताधारी भाजप आमदारांना हवे तसेच झालेले आहे. अखेरच्या क्षणी प्रभाग राखीवता जाहीर करून कोर्टात जाण्यासही वेळ दिलेली नाही.
पक्षाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते ट्रोजन डिमेलो म्हणाले, अनुसूचित जमातींचे आरक्षण ५ टक्क्यांवर आणून त्यांच्यावर अन्याय केला. ओबीसींना २७ टक्के दिलेली राखीवता ही एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवूनच आहे. सत्तेसाठी गरीब, शोषित समाजाला नष्ट करण्यासाठी हे सरकार निघाले आहे.
धिरयोंच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान न्यायालयाचा आदेश धुडकावणारे आहे. न्यायालयाची बंदी असतानाही मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पोलीस स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर तब्बल चार तास धिरयो चालतात आणि पोलीस कोणतीच कारवाई करीत नाहीत हे काय, असा सवाल करून ट्रोजन यांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)