मंत्री सरदेसाई यांच्याशी पक्ष नेतृत्व बोलेल : भाजप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 09:36 PM2018-05-24T21:36:16+5:302018-05-24T21:36:16+5:30
राज्यातील खनिज खाणी नव्याने सुरू व्हाव्यात म्हणून सगळे मंत्री, आमदार आणि सरकार प्रयत्न करत आहे. गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांचे जे काही प्रश्न किंवा गा:हाणी आहे त्याविषयी भाजपचे नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करील व तोडगा काढील, असे प्रदेश भाजपने गुरुवारी येथे स्पष्ट केले.
पणजी - राज्यातील खनिज खाणी नव्याने सुरू व्हाव्यात म्हणून सगळे मंत्री, आमदार आणि सरकार प्रयत्न करत आहे. गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांचे जे काही प्रश्न किंवा गा:हाणी आहे त्याविषयी भाजपचे नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करील व तोडगा काढील, असे प्रदेश भाजपने गुरुवारी येथे स्पष्ट केले.
प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी प्रेमानंद म्हांब्रे व हेमंत गोलतकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. खाणबंदीवर तोडगा निघाला नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही भाजपला पाठींबा द्यावा की नाही याबाबत फेरविचार करावा लागेल असे मंत्री सरदेसाई म्हणाले होते. त्याविषयी पत्रकारांनी विचारताच नाईक म्हणाले, की भाजपचे नेतृत्व सरदेसाई यांच्याशी बोलून त्यांचे म्हणणो जाणून घेतील. खनिज खाणी भाजप सरकारने बंद केलेल्या नाहीत. काँग्रेस पक्ष तसे चुकीचे चित्र उभे करत आहे. खनिज खाणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच नव्हे तर आताच पुन्हा सुरू व्हाव्यात असे सगळ्य़ाच मंत्री, आमदारांना व भाजपलाही वाटते. सरकार त्यावर उपाय काढील. खनिज खाण घोटाळ्य़ात काँग्रेसचे नेते अडकले आहेत, भाजपचे नव्हे.
यात्र नव्हे स्टंट (चौकट)
काँग्रेसची सध्याची नमन तुका गोंयकारा ही यात्र म्हणजे प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे, अशी टीका नाईक यांनी केली. राज्यात काँग्रेसचे सरकार अधिकारावर येत नाही म्हणून प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे वैफल्यग्रस्त बनले आहेत व त्यामुळे ते यात्र काढत आहेत. सासष्टीत झालेल्या यात्रेवेळी काँग्रेसचे केवळ एकच आमदार सहभागी झाले. काँग्रेस पक्षाने लोकांच्या समस्या जरूर ऐकून घ्याव्यात पण या समस्या सोडविणो काँग्रेसला शक्य आहे का ते सांगावे, असे नाईक म्हणाले.
काँग्रेसने सात दिवसांचा अवधी राज्यपालांना दिला होता. सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याला बोलाविले जावे असे काँग्रेसचे म्हणणो होते. सात दिवसांची मुदत संपली. आता यापुढे काँग्रेस पक्ष काय करणार ते त्या पक्षाने जाहीर करावे. काँग्रेसचे एक माजी मुख्यमंत्री म्हणतात, की गोवा विधानसभेच्या व लोकसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेतल्या जातील. काँग्रेसचे हे दिवास्वप्न आहे. विद्यमान भाजपप्रणीत आघाडी सरकार हे पाच वर्षे टीकेल हे काँग्रेसने लक्षात ठेवावे, असे नाईक म्हणाले.
काँग्रेस नेते यात्रेवेळी बसमधून फिरतात असे दाखविले जाते. प्रत्यक्षात त्या बसमध्ये कुणीच प्रवासी दिसत नाहीत. फक्त सात-आठ काँग्रेस कार्यकर्ते तेवढे दिसून येतात. लोकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर काँग्रेस पक्ष पुढे काय करील ते चोडणकर यांनी सांगावे. लोकांची दिशाभुल करू नये. काँग्रेसच्या मतदारसंघात व विशेषत: सत्तरी तालुक्यात जाऊन चोडणकर यांनी यात्र काढावी असे आव्हान असल्याचे नाईक म्हणाले.
दरम्यान, येत्या 26 रोजी केंद्रातील भाजप सरकार चार वर्षाचा कालावधी पूर्ण करत आहे. त्यानिमित्ताने दि. 26 पासून पंधरा दिवस पक्षातर्फे विविध कार्यक्रम होतील.