लोलयेतील ‘पारव्यादोण’ गोव्यातील मोठी गुहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2017 09:38 PM2017-03-20T21:38:15+5:302017-03-20T21:38:15+5:30
गोव्यात अनेक ठिकाणी पाषाणी गुहा आहेत; परंतु लोलये-काणकोण येथील समुद्रकिनाऱ्याजवळ असलेली ‘पारव्यादोण’ ही गुहा गोव्यातील सर्वात लांब गुहा आहे.
वासुदेव पागी
पणजी, दि. 20 : गोव्यात अनेक ठिकाणी पाषाणी गुहा आहेत; परंतु लोलये-काणकोण येथील समुद्रकिनाऱ्याजवळ असलेली ‘पारव्यादोण’ ही गुहा गोव्यातील सर्वात लांब गुहा आहे. ९० मीटर लांब असलेल्या या गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ पायवाटेने आणि तेही मोठी कसरत करून जावे लागत असल्यामुळे ती प्रसिद्धीझोतात राहिली नाही. राज्याच्या दक्षिण सीमेवर वसलेल्या या गावाला लांब किनारपट्टी लाभली आहे.
दगडाळ किनाऱ्याच्या या भागात ज्या ज्या ठिकाणी मोक्याच्या जागा आहेत त्या ठिकाणांना वेगवेगळे दर्या म्हटले जाते. अशाच एका दर्याला कूप या नावाने ओळखले जाते. याच कूप किनाऱ्यालगत आहे ही ९० मीटर लांबीची पाषाणी गुहा. या गुहेत जाल तर गुहेच्या दारात पाय ठेवताच वटवाघळांचे थवे एकाच वेळी विचित्र आवाज करीत वेगाने पळताना दिसतील. काही वटवाघळे उलटी टांगलेली दिसतील. दृष्टी कमजोर असलेल्या या वटवाघळांना ध्वनिलहरींच्या आधारावर तेथून दूर जायला बराच वेळ लागतो. त्यामुळे गुहेत शिरण्यासाठी बराच वेळ दारातच थांबावे लागते. एका बाजूने आत गेले तर ९० मीटरवर दुसऱ्या बाजूने त्याला छोटेसे खिंडार आहे; परंतु त्यातून बाहेर जाण्याचा प्रयत्न सहसा कोणी करीत नाहीत. ही गुहा जरी असली तरी त्यात २४ तास समुद्राचे पाणी असते. गुहेच्या मागच्या बाजूने ते गुहेत शिरते. ढोपर बुडेल इतके पाणी गुहेत मध्यभागी असते. त्या पुढे ते आणखी खोल आहे. जगातील बहुतेक गुहा कशा निर्माण झाल्या याबद्दल कारणे सांगितली जातात.
काही गुहा या मानवनिर्मित असतात तर काही नैसर्गिक. पारव्यादोण गुहा ही समुद्राच्या लाटांच्या प्रहारांमुळे निर्माण झाल्याचा तर्क भूगोलाचे अभ्यासक प्रो. एफ.एम. नदाफ करतात. समुद्राच्या लाटांत प्रचंड शक्ती असते. लाटांच्या सततच्या आघातात दगडांची झीज होते. तेथील पाषाणी आणि इतर दगडांना चिरा गेलेल्या दिसतात त्या याच प्रक्रियेमुळे, असे प्रो. नदाफ सांगतात. पारव्यादोण गुहा ही राज्यातील सर्वांत लांब गुहा असली तरी या ठिकाणी चुकून कोणी पर्यटक येतात. देशीही नाही आणि विदेशीही नाही. राज्याच्या पर्यटन नकाशावर या गुहेचा उल्लेख नाही. तसेच या ठिकाणी पोहोचण्यासाठी थेट रस्ते नाहीत.
दीड दोन किलोमीटरवर वाहन ठेवून पायवाटने जावे लागते. पायवाटही कसरतीची असून बूट घालून चालणे या ठिकाणी जोखमीचे आहे. या किनाऱ्यावर दिसत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, काही जुने कपडे, मीठ घालून ठेवलेल्या कागदाच्या पुड्या, त्या ठिकाणी थाटलेल्या दगडी चुली या पाहून या ठिकाणी पर्यटकांची ये-जा होत असल्याचा समज होण्याचीही शक्यता आहे. या ठिकाणी येणे-जाणे होते हे खरे; परंतु ते पर्यटकांचे नसून लोलये ग्रामस्थांचे. येथील लोक या किनाऱ्यांवर वस्ती करतात. संध्याकाळी येऊन एक रात्र त्या ठिकाणी घालवितात. मासेमारी वगैरे करून जेवण तेथेच बनवितात आणि झोपतात.
सकाळी उठून घरी येतात. ही लोलये गावची अनोखी परंपराच आहे. वस्तीला जाऊया का, असे या गावातील कोणी म्हटले तर ते दुसरीकडे तिसरीकडे कोठेच नसून दर्यावर जाऊन वस्ती करणे असेच ते अभिप्रेत असते. असे किमान १६ वस्तीचे दर्या या ठिकाणी आहेत. पाहुण्यांना या ठिकाणी सवय नसल्यामुळे एक एक पाऊल टाकताना जपून जावे लागत असले तरी लोलयेवासीय या ठिकाणी रात्रीच्या अंधारातही बिनदिक्कत वावरतात. एका हातात मासे पकडण्याचा गळ, खांद्याला नायलॉनच्या जाळीसारखी पिशवी घेऊन इथल्या कडेकपारीतून सहज फिरत असतात.