झोनिंग प्लान विश्वजीतकडून रद्द; पेडणे तालुक्यात जल्लोष 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 03:01 PM2023-10-14T15:01:02+5:302023-10-14T15:01:47+5:30

लोकांना विश्वासात घेऊन सगळी प्रक्रिया नव्याने होणार

pedne zoning plan canceled by vishwajit rane | झोनिंग प्लान विश्वजीतकडून रद्द; पेडणे तालुक्यात जल्लोष 

झोनिंग प्लान विश्वजीतकडून रद्द; पेडणे तालुक्यात जल्लोष 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पेडणेचा झोनिंग प्लान आता अस्तित्वातच नाही, हा प्लान आता रद्द करण्यात आल्याचे नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी काल अखेर जाहीर केले आणि पेडणेकार जिंकल्याची भावना पेडणे तालुक्यात निर्माण झाली. यापुढे सगळी प्रक्रिया लोकांना विश्वासात घेऊनच व लोकसभागाद्वारेच केली जाईल, असे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

मंत्री राणे म्हणाले की, लागवडीखालील जमिनींमध्ये जी घरे आहेत, ती सर्व घरे सरकार वाचवणार आहे. तसेच स्थानिकांशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. काहीजण लोकांची दिशाभूल करून चिथावणी देत आहेत, हे योग्य नव्हे. पेडणे झोनिंग प्लॅन रद्द झालेला असून तो आता अस्तित्वात नाही. केंद्र सरकारने मोपा विमानतळ आणि आयुष इस्पितळ असे दोन मोठे प्रकल्प पेडणेवासीयांना दिले. पेडणेच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. आजवर पेडणे तालुक्यात लागवडीखालील जमिनींमध्ये जी घरे होती, ती सेटलमेंट झोनमध्ये आणण्याचे काम कोणीही केले नाही. आम्हीही घरे वाचवणार आहोत. हा माझा शब्द आहे. या झोनिंग प्लॅनवरून गेले काही दिवस मोठा वाद निर्माण झाला होत. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी प्लॅन रद्द न केल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता.

लपाछपी खेळू नका: बागकर

मांद्रे काँग्रेसचे गटाध्यक्ष नारायण रेडकर यांनी प्रतिक्रिया देताना हा पेडणेवासीयांच्या एकजुटीचा विजय असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेसचे नेते बाबी बागकर म्हणाले की, लोकलढ्याचा विजय झाला आहे. पण लोकांनी सावध राहावे. प्लान रद्दची अधिसूचना टीसीपीने जारी करावी. सरकारने पुन्हा पेडणेच्या लोकांशी लपाछपीचा खेळ खेळू नये.

लोकांची भावना लक्षात घेऊनच निर्णय : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, लोकभावनेचा आदर करून सरकारने झोनिंग प्लॅन रद्द करण्याचा निर्णय घेतला. माझे सरकार पेडणेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय काही करणार नाही. पेडणेतील अनेक लोक मला भेटले. त्यानंतर मी नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे या विषयावर चर्चा केली व झोनिंग प्लॅन रद्द करण्याचा निर्णय घेतला. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर हेही याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते.

राजकारण करू नका : राणे

सरकार नेहमी जनतेचा विचार करूनच निर्णय घेत आले आहे. गोमंतकीयांना जास्ती जास्त सुख सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य असून त्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील. झोन प्लॅन रद्द झाल्याने आता त्याबाबत आणखी चर्चा नको. मी हा प्लॅन तूर्त बाजूला ठेवला आहे. पेडणे तालुक्याला विकासाची गरज आहे. कालांतराने प्लॅन तयार करायचा झाला तर लोकांमध्ये जाईन, त्यांच्या सूचना, मते जाणून घेईन. तसेच सल्लागारांकडून त्यांची मते घेईन. झोनिंग प्लॅनच्या बाबतीत यापुढे कोणीही राजकारण करू नये. पेडण्याच्या लोकांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. जनतेचा आवाज हा सर्वांत बुलंद आवाज हे सरकारला ठाऊक आहे.

न्याय मिळाला : जीत आरोलकर

झोनिंग प्लॅन सरकारला रद्द करावा लागला. पेडणेवासीयांना खया अर्थाने न्याय मिळाला, अशा शब्दांत मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी समाधान व्यक्त केले. या झोनिंग प्लॅनविरोधात आंदोलन उभे गेले होते. १५० लोकांना घेऊन आरोलकर मुख्यमंत्र्यांना भेटले होते व प्लॅन केवळ स्थगित ठेवून चालणार नाही तर तो रद्दच करा, अशी मागणी त्यांनी केली होती. झोन प्लॅन रद्द न केल्यास सरकारमधून बाहेर पडेन, असा इशाराही त्यांनी सुरुवातीला दिला होता. जीत यांनी या विषयावर चांगलेच रान उठवले होते. पेडणे तालुक्यातील लोकांना घेऊन त्यांनी याप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आता झोनिंग प्लान रद्द करण्यात आल्यामुळे पेडवासीयांनी जल्लोष साजरा केला आहे.


 

Web Title: pedne zoning plan canceled by vishwajit rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा