पे-पार्किंगप्रश्नी भाजप नगरसेवकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2016 02:30 AM2016-04-23T02:30:36+5:302016-04-23T02:31:05+5:30
पणजी : पणजी शहरातील अठरा रस्त्यांच्या बाजूने अतिशय जास्त शुल्क आकारून पे-पार्किंग लागू केले जाऊ नये, अशी मागणी
पणजी : पणजी शहरातील अठरा रस्त्यांच्या बाजूने अतिशय जास्त शुल्क आकारून पे-पार्किंग लागू केले जाऊ नये, अशी मागणी महापालिकेतील भाजप नगरसेवकांच्या गटाने केली आहे. प्रचंड शुल्काच्या पे-पार्किंग प्रस्तावाबाबत महापौर सुरेंद्र फुर्र्तादो हे ठाम राहिले तर येत्या २८ रोजी महापालिकेवर मोर्चा नेला जाईल, असा इशारा भाजपचे नगरसेवक मिनीन डिक्रुज, शेखर डेगवेकर आणि रूपेश हळर्णकर यांनी दिला आहे.
तिन्ही नगरसेवकांनी शुक्रवारी भाजपच्या येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. पणजीतील लोकांची दुचाकी व चारचाकी वाहने वारंवार पणजीत कामानिमित्त फिरतात. शिवाय अनेक सरकारी व खासगी आस्थापनांतील कर्मचारी पणजीत येतात. या लोकांना पे-पार्किंगसाठी खूप पैसे खर्च करावे लागतील. ही शुल्कवाढ त्वरित मागे घेतली जावी, अशी मागणी मिनिन डिक्रुज व इतरांनी केली. महापौरांनी स्वत:च कुणाशीही चर्चा न करता हा प्रस्ताव एकतर्फी पद्धतीने आणला आहे. एका पराभूत नगरसेवकाला पे-पार्किंगचे कंत्राट देण्यासाठी घाट घातला जात आहे, आम्ही या प्रस्तावास सर्व शक्तीने विरोध करू, असे डिक्रुज यांनी सांगितले.
भाजप समर्थक नगरसेवकांची महापालिकेत सत्ता होती, तेव्हा एकूण अठरा रस्त्यांसाठी जे शुल्क लागू केले होते ते सर्वांना परवडण्यासारखे होते. मात्र, त्याबाबतचे कंत्राट रद्द करून आता नवी शुल्कवाढ सुचविली गेली आहे. महापौरांनी महापालिकेच्या अस्थायी समितीच्या बैठकीत नुकताच हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्या वेळी समितीच्या सदस्यांपैकी फक्त शुभम चोडणकर व वैदेही नायक यांनी त्यास विरोध केला. त्या वेळी महापौर संतापले. उदय मडकईकर, लता पारेख, अस्मिता केरकर आदींनी विरोध केला नाही. येत्या २८ रोजी महापालिका मंडळाची बैठक होणार आहे. त्या वेळी या नव्या शुल्कवाढीस विरोध करूच. शिवाय महापौरांनी प्रस्ताव मागे घेतला नाही तर लोकांना घेऊन आम्ही महापौरांवर मोर्चा नेऊ, असे डिक्रुज म्हणाले. (खास प्रतिनिधी)