देशभरात मद्यपी चालकांसाठी 5 हजार रुपयांचा दंड लागू होणार; गोव्याच्या वाहतूक मंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 03:08 PM2017-09-05T15:08:25+5:302017-09-05T15:09:57+5:30
केंद्रीय मोटर वाहन कायद्यात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.
सदगुरू पाटील
पणजी, दि. 5 - केंद्रीय मोटर वाहन कायद्यात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. मद्य पिऊन वाहन चालवताना आढळल्यास संबंधित चालकाला पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. तशीही तरतुद कायद्यात असून 2018 साली या तरतुदी अंमलात येतील, असं गोव्याचे वाहतूक मंत्री सुदीन ढवळीकर यांनी सांगितलं आहे.
लोकसभेत नव्या मोटर वाहन कायद्यासंबंधिचं विधेयक संमत झालं आहे. डिसेंबरमध्ये राज्यसभेतही ते संमत झालं की मग प्रत्येक राज्याला नियम तयार करून नवा कायदा अंमलात आणावा लागेल, असं मंत्री ढवळीकर म्हणाले आहेत.
हेल्मेट न घालता दुचाकी चालवताना कुणीही सापडल्यास एक हजार रुपये दंड भरावा लागेल. देशभर वाहतूक क्षेत्रात नवा कायदा अनेक बदल घडवून आणेन, असं मंत्री ढवळीकर यांनी नमूद केलं आहे.
गोव्यातील सर्व महामार्ग, जिल्हा रस्ते व अन्य मार्गांवर यापुढे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन कळून येईल, असंही ते म्हणाले.
गोमंतकीय वाहनधारकांच्या घरी टपालाने वाहन चालक परवाना आणि वाहन नोंदणी पुस्तिका (आर.सी. बूक ) पाठविण्याची व्यवस्था मंगळवारी सुरू करण्यात आली. अशा प्रकारची व्यवस्था असलेले गोवा हे पहिले राज्य ठरलं आहे. स्मार्ट कार्डच्या रूपात 48 तासात गोमंतकीयांच्या घरी परवाना व आरसी बूक जाईल. लोकांना त्यासाठी वाहतूक खात्यात जावे लागणार नाही, असं मंत्री ढवळीकर म्हणाले.
यापुढील काळात वाहन चालवण्यासाठी शिकाऊ परवानादेखील घरबसल्या मिळविण्याची सोय होणार आहे. घरातून ऑनलाईन पद्धतीने चाचणीला सामोरं जावं लागेल, असं ढवळीकर म्हणाले.