भाजीपाला खरेदीसाठी पुन्हा लोकांची झुंबड; कर्फ्यू वाढल्यानं एकच गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 10:18 PM2020-03-23T22:18:50+5:302020-03-23T22:21:04+5:30
भाजी पुरवठाही कमी असल्यानं नागरिकांचा गोंधळ
मडगाव: कुठलीही पूर्वकल्पना न देता गोव्यातील कर्फ्यू तीन दिवसांनी वाढविल्याचा विपरीत परिणाम सोमवारी दिसून आला. लोकांनी सामाजिक अंतर पाळावे या हेतूने जरी हा कर्फ्यू वाढविण्यात असला तरी अत्यावश्यक वस्तूच मिळणार नाहीत या भीतीने लोकांनी दुकानावर गर्दी केल्याचे दिसून आले. विशेषत: भाजी खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी उडाली होती. त्यातच सोमवारी बेळगावातून भाजी घेऊन येणारी वाहनेच न आल्याने भाज्यांचा तुटवडाही जाणवला.
सोमवारी सकाळी लोकांनी भाज्यांच्या दुकानांवर गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी काही ठिकाणी लगेच येऊन ही दुकाने बंद केल्याने लोकांची निराशा झाली. या गर्दीचा फायदा उठवत काही दुकानदारांनी अव्वाच्या सव्वा दरात भाजी विकली. मडगावातील गांधी मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांना विचारले असता, रोज गांधी मार्केटात बेळगावहून तीन ट्रक भाजी येते पण सोमवारी एकही ट्रक आला नाही असे त्यांनी सांगितले.
या कर्फ्यूतून अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांना वगळण्यात आल्याचे सांगूनही सोमवारी पोलिसांनी किराणा मालाची दुकानेही जबरदस्तीने बंद करायला लावली. लोटली येथे सकाळी किराणा माल खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना हात हलवित परत यावे लागले. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना आपचे रामीरो मास्कारेन्हस यांनी कर्फ्यू म्हणजे लोकांना उपाशी मारण्याचे साधन नव्हे अशी टीका केली. किराणा मालाची दुकाने काही काळासाठी जरी उघडली तरी ती पोलिसांकडून बंद केली गेल्याची माहिती त्यांनी दिली.
फक्त किराणा मालाचीच नव्हे तर वृत्तपत्ने विकणारी दुकानेही काही ठिकाणी पोलिसांनी बंद केली. दुसऱ्या बाजूने वृत्तपत्र विक्रेत्या मुलांनीही पेपर न टाकल्याने कित्येकांना वृत्तपत्रेही वाचता आली नाहीत. केवळ औषधालयेच कुठल्याही निर्बंधाशिवाय खुली होती. सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळेही अत्यावश्यक ठिकाणी कामावर जाणा:या लोकांची अडचण झाली. काही जणांनी आपली खाजगी वाहने घेऊन कामावर येणे पसंत केले.
ही गोंधळाची स्थिती हाताळण्यासाठी अशा कर्फ्यूत लोकांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने काय करावे आणि काय करू नये याची नेमकी माहिती सरकारने लोकांना द्यावी अशी आपचे सिद्धार्थ कारापूरकर यांनी केली आहे.
पाववाल्यांना कामाची मोकळीक द्या
गोवा सरकारने लागू केलेल्या तीन दिवसांच्या कर्फ्यूत गोव्यातील बेकरीवाले आणि पाववाले सामील होण्यास तयार आहेत. पण या व्यावसायिकांना आपली भट्टी सुरू करण्यासाठी थोडा वेळ या कर्फ्यूतून मोकळीक द्या अशी मागणी गोवा बेकर्स संघटनेचे अध्यक्ष पीटर फर्नांडीस यांनी केली आहे. भट्टी दोन तीन दिवस बंद ठेवली तर ती परत सुरू करण्यासाठी बराच वेळ जातो आणि त्यासाठी लाकडेही जास्त लागतात. गोव्यात पाव ही गरजेची गोष्ट असल्याने निदान थोडे तरी पाव भाजण्यासाठी त्यांना मोकळीक द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.