'वारंवार बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांचा सावंत सरकारवरचा विश्वास उडाला'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 03:29 PM2020-04-07T15:29:49+5:302020-04-07T15:30:32+5:30

कोरोनाची  लागण नसल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच कर्मचाऱ्यांना सर्वेला पाठवा; काँग्रेसची मागणी

people lost their faith on cm pramod sawants government says congress amid coronavirus | 'वारंवार बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांचा सावंत सरकारवरचा विश्वास उडाला'

'वारंवार बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांचा सावंत सरकारवरचा विश्वास उडाला'

Next

मडगाव: मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सांवत सरकारची कोरोना हाताळण्याची दुर्बलता व  सरकारचे मिनिटा-मिनिटाला बदलणारे निर्णय व एकंदर गोंधळाचे वातावरण यामुळे गोव्यातील भाजप सरकारवरचा लोकांचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या सहा हजार सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन १३ एप्रिलपासून गोव्यात सुरू करण्यात येणार असलेल्या सामाजिक आरोग्य सर्वेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

याबद्दल बोलताना ते म्हणाले, प्रत्येक कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करावी व त्याना कोरोनाची लागण नसल्याचे प्रमाणपत्र  व सुरक्षा कवच सामग्री (पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट) देऊनच त्यांना लोकांच्या घरी पाठवावे. सरकारने उशिरा का होईना, परंतु टेस्टिंग प्रयोगशाळा गोव्यात सुरू केली. त्याचे आम्ही स्वागत करतो. मुख्यमंत्र्यांनी सामाजिक सर्वेपेक्षा सामाजिक टेस्टिंग करणे महत्वाचे आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी फ्रंटलायन कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण व पगारवाढ देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. परंतु, सदर घोषणा कागदोपत्रीच राहू नये याची सरकारने काळजी घेणे महत्वाचे आहे. दक्षिण गोवा इस्पितळ पूर्ण झाल्याची मुख्यमंत्र्यानी घोषणा करुन आठवडा उलटला तरी तेथे काम चालुच आहे तसा प्रकार या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होऊ नये असे चोडणकर म्हणाले.

सरकार आज कोव्हिड १९चा सामना करण्यासाठी अवाढव्य पैसा खर्च करीत आहे. सरकारच्या आरोग्य खात्याने तर सर्व निविदा प्रक्रिया व नियम बाजुला ठेवुन वेगवेगळ्या मोबाईल ॲपची खरेदी चालवली आहे. सदर ॲप केंद्र सरकारकडुन मोफत उपलब्ध होत असताना, खासगी आस्थापनांकडुन ते विकत घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यातले शीतयुद्ध आज संपूर्ण गोव्याला माहीत आहे.

मुख्यमंत्र्यानी राखीव खाण निधी कोव्हिड फंड म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने सर्व नियम पाळूनच जनतेचा पैसा खर्च करावा. काॅंग्रेस पक्ष सरकारच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे व कुठेही भ्रष्टाचार व लाचखोरी आढळल्यास आम्ही सरकारला उघडे पाडू हे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात ठेवावे असा इशारा त्यांनी दिला.

सरकारने ६००० सरकारी कर्मचाऱ्यांना सामाजिक आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी पाचारण करताना त्यांची अगोदर कोरोना चाचणी करणे महत्वाचे आहे व त्याना सुरक्षाकवच सामग्री देणे गरजेचे आहे. जर यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असेल व ते लोकांच्या संपर्कात आले तर त्यामुळे संपूर्ण गोव्यात हाहाकार उडू शकतो. कोरोनावर अभ्यास केलेल्या अनेक तज्ञांनीही अशी भीती व्यक्त केली असून, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना सुरक्षाकवच सामग्री पुरवणे व सामाजिक टेस्टिंग करणे महत्वाचे असल्याचे प्रत्येक तज्ञांनी मान्य केले आहे. दुर्दैवाने केंद्र व राज्य सरकारने या नेमके याच गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री आपले निर्णय कायम बदलत असतात. सामाजिक सर्वेक्षण ख्रिस्ती समाजाच्या पवित्र दिवसांत घेण्याचा निर्णय त्यानी घेतला व त्यावर आम्ही आवाज उठवताच अवघ्या काही मिनीटांत त्यानी तो निर्णय फिरवला याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: people lost their faith on cm pramod sawants government says congress amid coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.