दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले: राज्यपाल, राज्याच्या प्रगतीचा आलेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2024 09:49 AM2024-02-03T09:49:22+5:302024-02-03T09:51:04+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी तासभर केलेल्या अभिभाषणातून सरकारची गेल्या वर्षभरातील उपलब्धी तसेच आगामी योजनांचा पाढा वाचला.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये राज्याचे एकूण घरगुती उत्पन्न ३३ टक्क्यांनी वाढले आहे. तर गोमंतकीयांचे दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी गोव्यात ३३,००० हून अधिक कारागिरांनी नोंदणी केली आहे, असे राज्यपालांनी विधानसभेत अभिभाषणात स्पष्ट केले. मात्र धगधगता म्हादई विषय किंवा खाण व्यवसाय निश्चितपणे कधी सुरू होणार, याबाबत कोणतेही भाष्य न केल्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काल, शुक्रवारी पहिल्याच दिवशी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी तासभर केलेल्या अभिभाषणातून सरकारची गेल्या वर्षभरातील उपलब्धी तसेच आगामी योजनांचा पाढा वाचला. राज्यपाल म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेने प्रचंड प्रगती दाखवली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये राज्याचे एकूण घरगुती उत्पन्न ३३ टक्क्यांनी वाढले आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने १२ नव्या उद्योगांना मंजुरी दिली. ९ उद्योगांच्या विस्तारकामासाठी परवानगी दिली. यातून ६८९ कोटी रुपये गुंतवणूक येणार असून ५,५६८ जणांना नोकऱ्या मिळतील. पोलिस कॉन्स्टेबलच्या ३० टक्के रिक्त जागा भरण्यात येत आहेत. १६१ होमगार्डना कॉन्स्टेबल म्हणून सेवेत घेतले आहे. राज्यपाल म्हणाले की, मुख्यमंत्री अप्रेंटीशीप योजनेखाली सरकारी कार्यालये व खासगी आस्थापनांमध्ये ८,८५२ युवकांची अप्रेंटिस म्हणून नियुक्ती केली.
खाणी कधी सुरू होणार काही स्पष्ट केले नाही, परंतु खनिज थाहतूक करणाऱ्या टिप्पर ट्रकवाल्यांना ग्रीन टॅक्स तसेच इतर करांच्या बाबतीत सवलत देण्यात येत आहे. १९८ अर्ज त्यासाठी मंजूर झाले आहेत, असे अभिभाषणात स्पष्ट करण्यात आले. अटल आसरा योजनेचा ४५९ एसटी बांधवांनी लाभ घेतलेला आहे.
दयानंद योजनेचे १.३८,१२४ लाभार्थी असून मानधनावर १८५.१९ कोटी रुपये खर्च करण्यात आला. गृह आधारच्या १ लाख ३४ हजार ३५१ लाभार्थी असून वर्षभरात १६१ कोटी म्हणून अधिक रुपये मानधनावर खर्च केले.
चार कोटींचे ड्रग्स जप्त
राज्यातील गुन्हे नियंत्रणात असल्याचा दावा करीत राज्यपाल म्हणाले की, २०२३ मध्ये ३.९६ कोटीचे ड्रग्स जप्त केले. गेल्या वर्षी घडलेल्या गुन्ह्यांपैकी ८५.८३ टक्के प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५,१९,४४३ गुन्हे नोंदवून ३४ कोटी रुपये दंड वसूल केला.