काँग्रेस नेत्यांचे शक्तिप्रदर्शन
By admin | Published: October 15, 2014 01:30 AM2014-10-15T01:30:54+5:302014-10-15T01:32:59+5:30
पणजी : मी कुठल्याच स्पर्धेत नाही. मला काँग्रेस पक्ष बळकट करायचा आहे. त्यासाठी मी कुणाच्याही घरी जाईन व वाट्याला येईल तो अनुभव घेईन,
पणजी : मी कुठल्याच स्पर्धेत नाही. मला काँग्रेस पक्ष बळकट करायचा आहे. त्यासाठी मी कुणाच्याही घरी जाईन व वाट्याला येईल तो अनुभव घेईन, असे लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना सांगितले.
फालेरो यांच्यासह काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी व आमदारांनी मिळून मंगळवारी पणजीत काँग्रेस हाउससमोर शक्तिप्रदर्शनच केले. राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रथमच काँग्रेसचे आमदार व अनेक नेते एकत्र व्यासपीठावर पाहायला मिळाले. फालेरो यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, आमदार विश्वजित राणे, पांडुरंग मडकईकर, बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, फ्रान्सिस सार्दिन, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, मोती देसाई, विजय पै, ज्योकिम आलेमाव, सुरेंद्र फुर्तादो, जितेंद्र देशप्रभू आदी या वेळी व्यासपीठावर होते.
फालेरो म्हणाले की, बूथ समित्या हा काँग्रेसचा पाया आहे. बूथ समित्यांच्या स्तरावरून मी काम सुरू करीन. लोकसभा व तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचा पराभव झाला, तरी काँग्रेस पक्ष संपलेला नाही. काँग्रेसजनांनी जाहीरपणे पक्षावर टीका करू नये. जर काही गाऱ्हाणी असतील, तर मला भेटून ती मांडावीत. मला कार्यालयात बसून काँग्रेसचे काम करायचे नाही. आम्हाला तळागाळातच जावे लागेल.
फालेरो म्हणाले की, खास दर्जाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. मात्र, त्याचबरोबर गोव्याला केंद्राकडून आर्थिक मदतीचीही गरज आहे. गोव्यातील लोक आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अडचणीत आहेत. सरकार कर्जे घेऊन लोकांच्या डोक्यावर कर्ज वाढवत आहे. आणखी मोठमोठे प्रकल्प उभे करणे म्हणजे कर्ज आणखी वाढणे, असा अर्थ होतो.
विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांचेही भाषण झाले. गोव्यातील लोकशाही राखून ठेवायला हवी. गोव्याच्या विकासात काँग्रेसचे फार मोठे योगदान आहे. आता इबोला रोगाची साथ जगातील काही देशांत पसरत आहे. गोव्यात जर इबोलाचा एक रुग्ण आला, तर पर्यटन उद्योग संपून जाईल. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची छाननी व्हायला हवी. (खास प्रतिनिधी)