गोव्यात नेतृत्त्वबदलाच्या विषयाला पूर्णविराम; मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 06:49 PM2018-09-23T18:49:53+5:302018-09-23T18:50:13+5:30
गोव्यात तूर्त नेतृत्त्वबदल होणार नाही, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या प्रदेश कोअर टीमसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय रविवारी जाहीर केला.
पणजी : गोव्यात तूर्त नेतृत्त्वबदल होणार नाही, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या प्रदेश कोअर टीमसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय रविवारी जाहीर केला. मात्र मंत्रिमंडळ पुनर्रचना व खातेबदल मात्र लवकरच केला जाणार आहे.
दिल्ली येथील आॅल इंडिया इन्स्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्सेस (एम्स) इस्पितळात उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिल्लीला जाण्याआधी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे नवा नेता कोण हा प्रश्न निर्माण झाला. मगोपचे नेते ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांचे नाव पुढे आले तेव्हा सरकारमधील अन्य एक घटक पक्ष गोवा फॉरवर्डने त्यांच्या नावाला विरोध केला होता. त्यामुळे भाजपाने केंद्रातून निरीक्षक पाठवून अहवालही घेतला होता.
अमित शहा यांनी रविवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच राहतील. मंत्रिमंडळ पुनर्रचना व खातेबदल केला जाईल, असे ट्विट केले आणि तूर्त नेतृत्त्वबदलाच्या विषयावर पडदा पडला. सरकारमध्ये घटक असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई म्हणाले की, ‘आमचा पाठिंबा पर्रीकर यांच्या नेतृत्त्वालाच आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून भाजपाने कोणताही बदल केल्यास आधी गोवा फॉरवर्डला विश्वासात घ्यावे लागेल.’ खातेवाटपाबाबत आपल्याला अधिक काही माहिती नसल्याचे त्यानी सांगितले.
Goa Chief Minister Manohar Parrikar will continue to lead the government of Goa. Changes in the cabinet will be announced soon: BJP President Amit Shah (File pic) pic.twitter.com/NfjdUZEXJt
— ANI (@ANI) September 23, 2018
सरकारमधील अन्य एक घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सर्वेसर्वा तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, ‘खातेवांटप होणार हे निश्चित आहे केवळ ते पितृपक्ष सुरु होण्याआधी व्हावे.’ ‘मी पितृपक्ष मानतो,’ असे ते म्हणाले तेव्हा पितृपक्षात नवी अतिरिक्त खाती मिळाली तर स्वीकारणार नाही का या प्रश्नावर ते म्हणाले की, या पंधरवड्यात काही देता येत नाही. कोणी देत असेल तर घेतल्यास वावगे नाही.’