४८ तासात घर बांधणीच्या परवानगीसाठी पावले उचलणार - कार्लुस आल्मेदा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 04:31 PM2018-11-10T16:31:20+5:302018-11-10T16:55:09+5:30
मुरगाव नियोजन विकास प्राधिकरण हद्दीत घर बांधायचे असल्यास या कार्यालयातून ४८ तासांच्या आत परवाना उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलणार आहे.
वास्को - मुरगाव नियोजन विकास प्राधिकरण हद्दीत घर बांधायचे असल्यास या कार्यालयातून ४८ तासांच्या आत परवाना उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलणार आहे. तसेच शहरातील खुल्या जागेत उद्यान-बालोद्यान उभारण्यासाठी पावले उचलणार आहे. यासाठी निधी मिळविण्यासाठी सरकारला प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती मुरगाव नियोजन तथा आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दिली.
२०१७ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यापासून मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाच्या चेअरमनपदाची खुर्ची रिक्त होती. शुक्रवारी (९ नोव्हेंबर) वास्कोचे आमदार कार्लुस यांची चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी कार्लुस यांनी दोन वेळा हे पद सांभाळले आहे. सोमवारी ते तिसऱ्यांदा या पदाचा ताबा घेणार आहेत.
आमदार कालुर्स यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर जनतेच्या हितासाठी त्यांच्याकडून काय पावले उचलण्यात येणार याबाबत त्यांच्याशी वार्तालाप केला असता स्वत:च्या जागेत घर बांधण्याकरिता या कार्यालयातून लागणारी परवानगी ४८ तासांच्या आत उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरात अनेक खुल्या जागा असून त्यांचा विकास करण्याकरिता मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाकडून पावले उचलण्यात येणार आहेत. यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मागण्यात येईल, असे आल्मेदा यांनी सांगितले. शहरातील वाहतूक व्यवस्था आणखी सुधारावी यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीने लवकरच आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही आल्मेदा यांनी सांगितले. ज्या ठिकाणी दिशा फलक इत्यादी गोष्टींची गरज आहे ते लवकर उपलब्ध करण्यात येणार, असे ते म्हणाले. दीड वर्षांपासून चेअरमनपदाची खुर्ची खाली होती. मात्र, या काळात नागरिकांकडून या कार्यालयाच्या कुठल्याच तक्रारी आलेल्या नसल्याचे आल्मेदा यांनी सांगितले.
दरम्यान कार्लुस आल्मेदा कदंब महामंडळ सरकारी वाहतूक बससेवेचे चेअरमनही असून त्यांच्याशी वास्कोत चालू असलेल्या नवीन कदंबा बसस्थानकाची माहिती जाणून घेतली. वास्को मतदारसंघातील नवीन बसस्थानकाचे काम सध्या जोरात चालू असून आतापर्यंत कंत्राटदाराला ९ कोटी ५० लाख रुपये फेडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ९६ कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प उभारण्यात येणार असून बसस्थानकाबरोबर येथे दुकाने, सभागृह, सरकारी कार्यालये अशा विविध सुविधा उपलब्ध असणार अशी माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पातून कदंबा महामंडळालाही पुढील काळात चांगला फायदा होणार असे कार्लुस म्हणाले. मागील दोन वर्षापासून या प्रकल्पाचे काम चालू असून येणाऱ्या दोन वर्षात वास्को कदंब बसस्थानक प्रकल्पाचे काम पूर्ण होणार अशी माहिती शेवटी दिली.