३३ कोटी देवांचा देश, सॉरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 11:38 AM2023-11-28T11:38:57+5:302023-11-28T11:39:22+5:30

नवीन वास्तू बांधून पूर्ण झाली आणि नेमका 'पांडू हवालदार' प्रदर्शित झाला. 'पांडू' हे नाव आदराने उच्चारण्याऐवजी उपहासाने उच्चारण्यात येऊ लागले.

petition in supreme court regarding to restrict gods name to the shop and its consequences | ३३ कोटी देवांचा देश, सॉरी!

३३ कोटी देवांचा देश, सॉरी!

अ‍ॅड. राजेश नार्वेकर, निवृत्त अध्यक्ष प्रशासकीय लवाद

देवदेवतांची नावे आस्थापनांना किंवा दुकानांना देण्यास प्रतिबंध करावा, अशी प्रार्थना करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. दुकाने किंवा धंद्यांना देवांची नावे देण्यात काहीच गैर नाही, असा निवाडा देताना 'देशात ३३ कोटी देव आहेत, सॉरी!' असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

भारतात जाती धर्माची विविधता असली तरी एकता आहे, असे नेहमी म्हटले जाते. पण विविध धर्मीयांना पूजनीय असणारे सर्व देव एकच आहेत, हे मानायला आपण तयार नसतो. काही का असेना आता आम्हाला आमच्या उद्योगधंद्यांना द्यायला ३३ कोटी नावे उपलब्ध आहेत. मटण विकणारा आपल्या दुकानाला 'हनुमान मटण स्टॉल' तर कोंबड्या विकणारा 'लक्ष्मी चिकन सेंटर' असे नाव द्यायला मोकळा आहे. मटण स्टॉलना 'वेताळ किंवा काळभैरव' ही नावेही शोभून दिसतील. अर्थात, ते दोघे देव की देवचार हे मला माहीत नाही. पंक्चर टायर काढून हवा भरणारा 'वायुदेव टायर' रिपेअरिंग, तर दिवे विकणारा 'सूर्यनारायण लाइट हाऊस' असे आपल्या दुकानाचे नामकरण करू शकतील. पूजेचे साहित्य उपलब्ध असलेल्या दुकानाला 'सत्यनारायण पूजा सेंटर' तर स्मशानाजवळ अंत्यविधी सामुग्री विकणाऱ्या स्टॉलबाहेर 'यमदेव साहित्य सेंटर' अशा पाट्या दिसल्यास आश्चर्य वाटायला नको, ग्रहशांतीच्या नावाने रत्ने, खडे, दोरे, ताईत विकण्याचे दुकान थाटलेल्यांना तर 'मंगळदेवा'पासून 'शनीदेवा 'पर्यंत सर्व पर्याय खुले आहेत. ख्रिस्ती लोकांसाठी 'काशाव' बनवणारे 'जिजस' तर मुस्लीम धर्मीय 'अल्ला'च्या नावाने दुकाने थाटू शकतात.

कुणाच्या मुलाचे नाव 'बालाजी', मुलीचे नाव 'लक्ष्मी' असेल तर त्यांची नावे दुकानांना दिली, तर काय बिघडले? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. पूर्वी मुलांची नावे बालाजी, सखाराम, तुकाराम, दामोदर, पांडुरंग, विष्णू, शंकर, तर मुलींची नावे गंगा, गोदावरी, यमुना, भानुमती, सत्यभामा, हिराबाई अशी सोपी सरळ असायची. आता मुला-मुलींना जी नावे ठेवली जातात त्यांचे उच्चार पालकांनाच नीट करता येत नाहीत, तर मुलं पाचवीत पोहोचेपर्यंत त्यांना आपल्या नावाचे स्पेलिंग व अर्थही माहीत नसतो. माझ्या काही नातेवाइकांच्या मुला-मुलींची नावे स्नेहीन, स्वानिका, वर्टाली, रित्वा, संकर्षण, आद्या, अप्रा, अस्मी अशी आहेत, जी मला नीट उच्चारताही येत नाहीत. त्यावर तोडगा म्हणून मुलांना 'बाबू' मुलींना 'बाय' हाक मारून मोकळा होतो.

आमच्या आजोबांचे नाव 'पांडुरंग.' ते आयुर्वेदिक वैद्य असल्यामुळे प्रसिद्ध होते. आम्ही आमचे जुने घर मोडून नवीन बांधण्याचे ठरवले तेव्हा सर्वानुमते इमारतीला 'पांडू सदन' नाव देण्याचे ठरवले. पण नवीन वास्तू बांधून पूर्ण झाली आणि नेमका दादा कोंडकेंचा 'पांडू हवालदार' चित्रपट प्रदर्शित झाला. आणि 'पांडू' हे नाव आदराने उच्चारण्याऐवजी उपहासाने उच्चारण्यात येऊ लागले. मग आम्ही आजोबांच्या नावाऐवजी त्यांचे आडनाव म्हणून 'नार्वेकर चेम्बर्स' नाव दिले.

आमच्या जुन्या घराला आजोबांनी 'गणेश सदन' नाव दिले होते. मी तिसऱ्या पिढीतला पहिला मुलगा असल्यामुळे मला आमच्या मूळ वास्तूचे 'गणेश' हे नाव देऊन आमच्या पिढीचा श्रीगणेशा करावा, अशी सूचना आमच्या देवभोळ्या आजीने केली. सगळ्यांना तेच नाव रास्त वाटले, पण नेमके माझ्या बारशादिवशी काका श्रीरंग नार्वेकर- जे महाराष्ट्रात एका नाटक कंपनीत कामाला होते, ते घरी आले. त्यांना गणेश नाव आवडले नाही, त्यावेळी अभिनेता 'राजेश खन्ना'चे नाव गाजत होते म्हणून 'गणेश' ऐवजी 'राजेश' असे माझे नामकरण झाले. त्यासाठी काकांचे आभार मानावे तेवढे कमीच.

आता ३३ कोटी देवांचे बघूया. तुमच्यापैकी कुणी एका तरी देवाला प्रत्यक्ष पाहिले आहे का? देव जर आम्ही प्रत्यक्ष पाहिला असता तर चित्रातल्या देवदेवतांचे चेहरे एकसारखे असायला हवे होते. माझ्याकडे सत्यनारायणाचे तीन फोटो आहेत, त्यात देवाचे चेहरे एकसारखे नाहीत. एकाने तर आपल्या कुलदेवतेचे चित्र एका चित्रकाराकडून रंगवून घेतले, त्यातील देवीच्या चेहऱ्यात व त्या व्यक्तीच्या आजीच्या फोटोतील चेहऱ्यात साम्य आहे. कुणी आपल्या आजीला आईला देवी मानतो, हे खरंच अनुकरणीय आहे. तो श्रद्धेचा भाग आहे.

माझ्या मते देव म्हणजे एक अदृश्य शक्ती असते. जिला नाव व रूप नसते. पण त्या शक्तीचे स्मरण ठेवून कुठलेही वाईट कृत्य किंवा पाप करायला आपण प्रवृत्त होत नाही. आपली पापं कुणीतरी पाहील आणि याच जन्मात आपल्याला शासन करील, अशी भावना आपल्या मनात जागृत होऊन पापकर्म करायला आपण परावृत्त व्हायला हवे. उलट वाईट कामे, पापे करून नंतर त्यांचे क्षालन व्हावे म्हणून देवाची पूजा करणे, याचा अर्थ आपण 'देवाला' मानतो असा होत नसून आपण 'देवाला' वापरतो असा होतो, असे मला वाटते. यासाठी कुणी मला नास्तिक म्हटले, तर ते बिरुद आनंदाने स्वीकारण्याची माझी तयारी आहे.


 

Web Title: petition in supreme court regarding to restrict gods name to the shop and its consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा