माटवे - दाबोळीतील नाल्यांतूनही वाहते पेट्रोल, ग्रामस्थ धास्तावले
By पंकज शेट्ये | Published: December 3, 2023 06:22 PM2023-12-03T18:22:45+5:302023-12-03T18:23:05+5:30
अग्निशामक दलासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना तेथे धाव घेवून पाहणी केली.
पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: माटवे - दाबोळी येथील एका विहिरीत पेट्रोलियम पदार्थमिश्रीत पाणी झाल्याचे सहा दिवसांपूर्वी उघड झाले होते. आता रविवारी (दि.३) गावातील नाल्यातील पाणीही पेट्रोलियम पदार्थमिश्रीत झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत. चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील नाल्यांतून वाहणाऱ्या पाण्याला पेट्रोलियम पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वास येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना तेथे धाव घेवून पाहणी केली.
माटवे येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक जेक्सन फर्नांडिस यांच्या घराबाहेरील जुन्या विहिरीच्या पाण्याला काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम पदार्थाचा वास आला. २७ नोव्हेंबर रोजी स्थानिक पंच निलम नाईक, जैवविविधता समितीचे पदाधिकारी, अग्निशामक दलाचे अधिकारी, मामलेदारांनी पाहणी केली होती. विहिरीत आढळलेला तो पेट्रोलियम पदार्थ कोणता हे स्पष्ट झालेले नाही. विहिरीतील पाणी एका बादलीत काढून पडताळणी केली असता त्या पाण्याला आग लागली. ते पेट्रोल अथवा डिझेल असावे अशी शक्यता आहे. त्यानंतर अग्निशामक दलाने ती विहिर सील केली आहे. या परिसरात आग लावू नये असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान झुआरी आयएव्ही प्रा. लि. व्यवस्थापनाने आतापर्यंत ३० टँकर पाणी विहिरीतून उपसले आहे. विहिरीत पेट्रोलियम पदार्थ मिसळून पाणी दूषित झाल्याप्रकरणी चिखलीच्या पंच निलम नाईक यांनी शुक्रवारी वास्को पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. पेट्रोलियम पदार्थ कोठे मिसळतो आहे याचा शोध सुरू आहे. मुरगाव बंदरातून भूमिगत वाहिनीद्वारे झुआरी आयएव्ही व्यवस्थापनाकडे पेट्रोलियम पदार्थ नेले जातात. त्या वाहिनीला गळती लागली असावी असा अंदाज आहे.
रविवारी (दि. ३) सकाळी माटवे दाबोळीतील नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याला मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम पदार्थांचा वास यायला सुरुवात झाली. पंच निलम नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी गेल्या काही दिवसांपासून नाल्यातील पाण्याला पेट्रोलसदृश्य पदार्थांचा वास येत असल्याचे सांगितले. रविवारपासून याची तिव्रता वाढली आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर योग्य कार्यवाही करावी. येथे आगीसारखी भयंकर घटना घडू शकते. त्यापूर्वीच सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना पावले उचलवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुरगाव बंदरातून झुआरी आयएव्ही व्यवस्थापनात जाणाऱ्या गळकी वाहिनी हटवावी.
दरम्यान, मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी यांना संपर्क साधला असता अग्निशामक दलाचे अधिकारी, मामलेदार कार्यालयातील अधिकारी आणि झुआरी आयएव्ही व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केल्याचे सांगितले. लोकाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केली जात असल्याची माहीती त्यांनी दिली.