गोव्यात पेट्रोल 1 रुपये 12 पैशांनी महागले, नवा दर 64 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 06:44 PM2019-01-15T18:44:57+5:302019-01-15T18:45:04+5:30
गोवा सरकारच्या अर्थ खात्याने मंगळवारी अधिसूचना जारी केली आणि पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (वॅट) 13 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवला.
पणजी : गोवा सरकारच्या अर्थ खात्याने मंगळवारी अधिसूचना जारी केली आणि पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (वॅट) 13 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवला. यामुळे पेट्रोल मंगळवारी मध्यरात्रीपासून प्रति लिटरमागे 1 रुपये 12 पैशांनी महागले. यामुळे सरकारच्या तिजोरीत दरमहा सुमारे तीन कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा होणार आहे.
वाणिज्य खात्याच्या अधिका-यांनी लोकमतला सांगितले की, पेट्रोलचा दर प्रति लिटर 62.87 रुपये होता. त्यावर दोन टक्के मूल्यवर्धित कर वाढविल्याने वार्षिक सुमारे 35 ते 36 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त होईल. अलिकडे पेट्रोलचा दर कमी झाला होता. पेट्रोल हे गोव्यात डिझेलपेक्षा स्वस्त होते.
वॅट वाढविण्याबाबतची अधिसूचना अर्थ खात्याच्या अव्वल सचिव सुषमा कामत यांच्या सहीने जारी झाली आहे. बियर आणि भारतीय बनावटीच्या विदेशी दारूसाठीही मूल्यवर्धित कर निश्चित करण्यात आला आहे, पण त्यांचे दर वाढलेले नाहीत. स्वयंपाक गॅसवरील वॅट 4 टक्के आहे. विदेशी दारू व बियरवर 22 टक्के मूल्यवर्धित कर आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी दारूवरही 22 टक्के वॅट आहे हेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात अजूनही पेट्रोल स्वस्तच आहे. शेजारील कर्नाटक व महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यात पेट्रोल व डिझेलचे दर कायम स्वस्त राहिले आहेत. 2012 साली मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार अधिकारावर आल्यानंतर सर्वप्रथम गोव्यात पेट्रोलवरील वॅट जवळजवळ काढून टाकला गेला होता व त्यामुळे गोव्यात पेट्रोल लिटरमागे सोळा रुपयांनी स्वस्त झाले होते. पूर्ण देशात तेव्हा गोव्याचे कौतुक झाले. पाच वर्षांनंतर मात्र गोव्यात पेट्रोल व डिझेलचा दर वाढत गेला.