पेट्रोल चोरीतील मास्टरमाईंड स्वेतन दोन महिन्यांनंतर शरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 05:50 PM2019-10-23T17:50:11+5:302019-10-23T17:51:49+5:30
उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला
मडगाव: इस्टर्न बायपास रस्त्यावर उघडकीस आलेल्या पेट्रोल चोरी प्रकरणातील मागचे दोन महिने अटक चुकवत असलेला मुख्य आरोपी स्वेतन सिमेपुरुषकर हा शेवटी बुधवारी फातोर्डा पोलिसांना शरण आला. त्याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मंगळवारी उच्च न्यायालयाने फेटाळला होता. मुख्य आरोपी सिमेपुरुषकर याला अटक केल्यानंतर आता या रॅकेटमधील अन्य आरोपींपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
भारत पेट्रोलियमच्या टँकरमधून इंधनाची चोरी करताना पोलिसांनी २८ ऑगस्टला दवर्ली भागात पाच जणांना अटक केली होती. सांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्या मालकीच्या शिरवई येथे असलेल्या पेट्रोल पंपवर इंधनाचा पुरवठा करण्यासाठी हा टँकर वास्कोहून रवाना झाला होता. त्यावेळी मधल्या वाटेत ही चोरी करताना आरोपींना पकडण्यात आले होते. त्यावेळी या रॅकेटचा मास्टरमार्इंड स्वेतन असल्याचे उघडकीस आले होते. स्वेतनने टँकरच्या टाकीची बनावट चावी करुन घेतली होती. याच चावीने टाकी उघडून ही चोरी केली जात होती.
यापूर्वी या प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी दस्तगीर पठाण, कृपाशंकर पटेल, राजेश शिरोडकर, अकबर दोडामणी व चंद्रकांत प्रभु या पाच जणांना अटक केली होती. नंतर त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले होते. या प्रकरणातील पाच संशयितांना जामिन मुक्त केल्यामुळे आपल्यालाही जामीन मिळावा यासाठी स्वेतन याने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र ज्या अर्थी स्वेतनकडे टँकरच्या टाकीची डुप्लीकेट चावी आहे, त्या अर्थी या कारस्थानात तेल कंपनीचेही कर्मचारी सामील असू शकतात असा दावा सरकारी वकील एस. आर. रिवणकर यांनी करुन या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वेतनला अटक करुन चौकशी करण्याची गरज आहे असा दावा न्यायालयात केला होता. हा दावा ग्राह्य धरुन न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी स्वेतनचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला होता.
फातोर्डा पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्याशी संपर्क साधला असता, संशयित स्वेतन शरण आल्याचे त्यांनी कबूल केले. आज गुरुवारी संशयिताला न्यायालयासमोर पेश करुन त्याच्या पोलीस कोठडीचा रिमांड घेतला जाणार आहे.