गोव्यात पेट्रोल 72.68 तर डिझेल 73 रुपये प्रति लिटर, व्हॅटमध्ये 4 टक्के कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 09:16 PM2018-10-05T21:16:01+5:302018-10-05T21:16:17+5:30
गोव्यात पेट्रोलचा दर आज शनिवारी पहाटेपासून (म्हणजेच शुक्रवारची मध्यरात्री) 72.68 रुपये प्रति लिटर व डिझेलचा दर 73 रुपये असा होणार आहे.
पणजी : गोव्यात पेट्रोलचा दर आज शनिवारी पहाटेपासून (म्हणजेच शुक्रवारची मध्यरात्री) 72.68 रुपये प्रति लिटर व डिझेलचा दर 73 रुपये असा होणार आहे. गोवा सरकारने पेट्रोलच्या सध्याच्या दरात लिटरमागे 2 रुपये 57 पैसे व डिझेलच्या दरात लिटरमागे 2 रुपये 50 पैसे अशी कपात केली आहे. मूल्यवर्धीत कराचे (व्हॅट) प्रमाण सरासरी 4 टक्क्यांनी कमी केल्यामुळे सरकारला महसुलाबाबत दर महिन्याला पाच कोटींचं नुकसानं सोसावं लागेल.
केंद्र सरकारने लिटरमागे अडीच पैसे कमी केल्यानंतर शुक्रवारी गोव्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 75 रुपये 25 पैसे असा होता. त्यात गोवा सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासून 2 रुपये 25 पैसे अशी कपात केली. पेट्रोलवरील व्हॅट 17 टक्के होता. तो 13 टक्के करण्यात आला. त्याविषयीची अधिसूचना जारी झाली आहे. डिझेलचा दर शुक्रवारी 74.42 रुपये प्रति लिटर असा होता. त्यात अडीच रुपयांची कपात केल्याने डिझेल आता 72.92 रुपये प्रति लिटर असे झाले आहे. पेट्रोल मालक 73 रुपयेच आकारतील.
गेल्या वर्षभरात गोव्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात लिटरमागे साधारणत: बारा रुपयांची वाढ झाली. यामुळे गोवा सरकारला पाच-सहा कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ होत होता. आता कपात झाल्याने सुमारे चार- पाच कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागेल. वाणिज्य कर खात्याचे आयुक्त दीपक बांदेकर यांनी लोकमतशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट 4 टक्क्यांनी कमी करण्याची कृती अलिकडे सरकारने केली नव्हती. ती आता केल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला पण गोव्यात अगोदरच पेट्रोल व डिझेलचे दर खूप वाढलेले असल्याने वाहनधारक आणखी कपात केली जावी, अशी मागणी करत आहेत. देशातील अन्य भागांच्या तुलनेत मात्र गोव्यात पेट्रोल व डिझेलचे दर कमी आहेत.