जेटींवरील माफियाराजवर उपाय काढणार, चौकशी करू - फिलिप नेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 03:38 PM2019-07-29T15:38:05+5:302019-07-29T15:39:04+5:30
पणजी-बेतीकडील मालिम जेटीवर मोठे अतिक्रमण झालेले आहे. तिथे गोमंतकीय मच्छीमारांना कोणी वाली नाही.
पणजी - राज्यातील मच्छीमारी जेटींवर जो प्रचंड गोंधळ दिसून येतो, त्यावर उपाय काढला जाईल. तेथील दादागिरी तसेच कथित माफियाराजची चौकशी करून सरकार तिथे शिस्त आणेल, अशी ग्वाही मच्छीमार खात्याचे मंत्री फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांनी सोमवारी (29 जुलै) विधानसभेत दिली आहे.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी याबाबतचा प्रश्न मांडला होता. पणजी-बेतीकडील मालिम जेटीवर मोठे अतिक्रमण झालेले आहे. तिथे गोमंतकीय मच्छीमारांना कोणी वाली नाही. दक्षता खात्याकडून सरकारने चौकशी करून घ्यावी, कारण गोमंतकीय ट्रॉलर व्यवसायिकांना तिथे डिझेल नाकारले जात आहे, असे आमदार हळर्णकर म्हणाले. आमदार फ्रान्सिस सिल्वेरा हे पारंपरिकरणे मासेमारीच्या धंद्यात आहेत पण त्यांच्या देखील बोटसाठी तिथे डिङोल नाकारले गेले, असे हळर्णकर यांनी सांगितले. हळदोणोचे आमदार ग्लेन तिकलो तसेच पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनीही हळर्णकर यांच्या मुद्दय़ाला पाठींबा दिला. मंत्री नेरी यांनी या विषयात प्राधान्याने लक्ष घालून आमच्यासोबत तातडीने मालिम जेटीला द्यावी आणि तेथील सावळागोंधळ पहावा असे खंवटे यांनी सूचविले. जेटीवर दादागिरी चालली आहे. तिथे माफियाराज आहे, असे खंवटे, तिकलो म्हणाले. गोमंतकीयांना दूर लाटून भलतेच तेथील सहकारी संस्थेवर येत आहेत असाही मुद्दा काही आमदारांनी मांडला. आमदार चर्चिल आलेमाव यांनी यावेळी आपला अनुभव सांगितला. केवळ मालिम जेटीच नव्हे तर वास्को, बेतुल व अन्य जेटींवरही शिस्त येण्याची गरज आहे, असे आलेमाव म्हणाले. एके ठिकाणची बोट दुसरीकडे नको अशी भूमिका आता घेतली जाते, ती चुकीची आहे असे ते म्हणाले.
आपण मालिम जेटीला लवकरच भेट देईन, असे आश्वासन मंत्री नेरी यांनी दिले आहे. तसेच सर्व जेटींवरील स्थिती सुधारू असेही त्यांनी सांगितले. मालिम जेटीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रसंगी पोलिसांची मदत घेऊ असे ते म्हणाले. या जेटीचा सरकार आता विस्तार करणार आहे पण तिथे अगोदर रस्ते वगैरे खूप अरुंद आहेत व रहदारी वाढलेली आहे हे सरकारच्या लक्षात असू द्या, असे आमदार खंवटे यांनी नमूद केले आहे.