गोव्यातील शाळांमध्ये महात्मा गांधींसोबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही दिसणार फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 01:48 PM2017-10-07T13:48:03+5:302017-10-07T13:48:57+5:30
गोव्यातील सरकारी प्राथमिक शाळांच्या भिंतीवर बापूजी म्हणजे महात्मा गांधी यांचे फोटो आहेतच. मात्र आता शाळांच्या भिंतीवर बापूंसोबत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही फोटो लावलेले पाहायला मिळतील.
पणजी : गोव्यातील सरकारी प्राथमिक शाळांच्या भिंतीवर बापूजी म्हणजे महात्मा गांधी यांचे फोटो आहेतच. मात्र आता शाळांच्या भिंतीवर बापूंसोबत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही फोटो लावलेले पाहायला मिळतील. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मोदी व कोविंद यांचे फोटो लावा, अशी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व खाते प्रमुखांना केलेली सूचना ताजी असतानाच आता शिक्षण खात्याने सर्व शिक्षकांना फोटो लावण्याविषयी बजावले आहे. यासाठी 6 नोव्हेंबर ही डेडलाईनही शिक्षकांना देण्यात आली आहे.
दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी जेव्हा मुले शाळेत येतील तेव्हा त्यांना भिंतीवर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे फोटो दिसायला हवेत असे शिक्षण खात्याने सर्व सरकारी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांना सांगितले आहे. त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापक यांची आतापासूनच धावपळ उडाली आहे. शिक्षण खात्याने फोटो लावणे हा एक कलमी कार्यक्रम तूर्त खूप गंभीरपणे घेतला आहे.
सर्व सरकारी शाळांच्या इमारती स्वच्छ ठेवा, वर्गात आणि वर्गाबाहेर स्वच्छता ठेवा. आम्ही अचानक येऊन स्वच्छतेची पाहणी करणार तसेच फोटो लागले आहेत की नाही हे देखील पाहू,असे शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी तालुका विभाग शिक्षणाधिकार्यांना सांगितले आहे.