दिलखुलास गोयल आणि गोवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 11:45 AM2023-06-04T11:45:56+5:302023-06-04T11:46:26+5:30

गोयल यांची बोलण्याची स्टाईल खूप प्रभावी व वेगळी आहे. इंग्रजी व हिंदीवरील प्रभुत्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक उठावदार बनवते.

piyush goyal goa visit | दिलखुलास गोयल आणि गोवा

दिलखुलास गोयल आणि गोवा

googlenewsNext

- सद्गुरू पाटील

मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत काय केले, कोणते विकास प्रकल्प व योजना राबविल्या याची माहिती देत सगळीकडे फिरण्याचा आदेश पंतप्रधानांनी सर्वच केंद्रीय मंत्र्यांना दिला आहे. गोयल यांची बोलण्याची स्टाईल खूप प्रभावी व वेगळी आहे. इंग्रजी व हिंदीवरील प्रभुत्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक उठावदार बनवते.

द्रातील काही बडे राजकीय नेते आपल्याला जेवढे गंभीर किंवा लोकांपासून दूर राहणारे वाटतात तेवढे ते असत नाहीत याचा प्रत्यक्ष अनुभव काहीवेळा येतो. पियुष गोयल मोदी मंत्रिमंडळातील अत्यंत महत्त्वाचे व वजनदार मंत्री. ते सातत्याने गोव्यात येत असतात. मात्र परवाच्या शुक्रवारी गोयल यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी संपादक या नात्याने मी घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. गोयल खूप दिलखुलास आहेत. मनमोकळा संवाद करताना ते वारंवार गोव्याविषयी प्रेम व आपुलकीने बोलत होते. मीडियाफ्रेंडली असणे म्हणजे काय याचा अंदाज त्यांच्याशी झालेल्या प्रश्नोत्तरावेळी आलाच.

मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत काय केले, कोणते फाइन विकास प्रकल्प व योजना राबविल्या याची माहिती देत सगळीकडे फिरण्याचा आदेश पंतप्रधानांनी सर्वच केंद्रीय मंत्र्यांना दिला आहे. गोयल यांची बोलण्याची स्टाईल खूप प्रभावी व वेगळी आहे. ती काहीशी प्रमोद महाजन यांच्याशी मिळतीजुळती आहे. स्वर्गीय महाजन ज्या पद्धतीने मुद्दा पटवून देत, तसेच कौशल्य गोयल यांच्याकडे आहे. इंग्रजी व हिंदीवरील प्रभुत्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक उठावदार बनवते, डोळ्यांवर चकचकीत काचेचा आरसपानी चष्मा, मस्त केस, पोशाखावर विशेष भर आणि प्रत्येक प्रश्नाला विस्ताराने उत्तर देण्याची आस यामुळे गोयल इतर काही केंद्रीय मंत्र्यांपेक्षा अधिक उजवे ठरतात.

शुक्रवारची रात्र दोनापावल येथील ताजचे भव्यदिव्य हॉटेल. तिथे गोयल बसले होते. 'मी गोव्यात गेली तीस वर्षे येतोय. हे तिसावे वर्ष आहे. एकही वर्ष असे गेले नाही, की मी गोव्यात आलो नाही,' गोयल अतिशय आत्मियतेने बोलू लागले. गोयल यांचे दोन कार्यक्रम झाले, एक मीडियाशी संवादाचा, दुसरा उद्योजकांसोबत प्रश्नोत्तरांचा. प्रत्येकास परिचय करून देण्याची विनंती त्यांनी केली. तेव्हा लोकमतच्या नावासह मी ओळख करून देताच ते प्रसन्न हसले. 'लोकमत को मैं करीब से जानता हूं, मैं मुंबई में रहता हूं.' * असे नमूद करायला पियुषजी विसरले नाहीत. आम्ही काही पत्रकार चहा पित होतो, त्यावेळी गोयल यांनी हसत हसत 'अरे भाई आपही चाय पियोगे क्या, हमें नहीं पिलाओगे?' म्हणत एकत्र चहा पिण्याचा आनंद घेतला. मीडियाफ्रेंडली असणे म्हणजे काय ते कळते.

उद्योजकांसोबत संवादाचा कार्यक्रम झाला तेव्हा गोयल यांनी गोव्याविषयीच्या आपल्या काही आठवणीही सांगितल्या. मला त्वचारोग झाला होता, तेव्हा गोव्यातच तयार झालेले एक औषध मी डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरले व पूर्ण ठीक झालो. गोव्याचे माझ्यावर उपकार आहेत, अशा अर्थाने ते बोलले. एखादा मुद्दा आवडला तर रुबाबदार हसणे ही गोयल यांची खासियत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा उल्लेख गोयल यांनी व्यासपीठावरून सातत्याने प्रमोदजी असाच केला. ते आपल्याला लहान भावासारखे असल्याने आपण त्यांचा पहिल्या नावाने उल्लेख करतो, असे त्यांनी आवर्जून सांगितले. उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांना गोयल विशेष महत्त्व देत आहेत हे अनेकांना जाणवले. माविनने फक्कड इंग्रजीत प्रभावी भाषण केले. गोयल यांना ते आवडले. माविनचे भाषण संपले तेव्हा पियुषजी उठून उभे राहिले व त्यांच्याशी हस्तांदोलन केले. डिनरपूर्वी ज्या ज्यावेळी फोटो काढण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा गोयल माविनना हाक मारून बोलवत होते. आपण जीएसटी मंडळाचा सदस्य होतो वगैरे सांगून माविनने अगोदरच पियुषजींवर छाप पाडली आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्याही ते लक्षात आले. मुख्यमंत्र्यांचा जास्तसा संवाद हिंदीतून झाला तर माविनचा इंग्रजीतून. हा फरकही गोयल यांच्या लक्षात आला असावा.

सध्या गोव्यातील हायवे पाहून भरून येते. काय देखणे रस्ते झाले आहेत. पंतप्रधान मोदी व केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मिळून हा विकास केला आहे, असे गोयल उत्साहाने सांगत होते. मी विमानतळावरून येताना मोबाईलवर बोलत होतो. पत्नीने मला 'अहो, मोबाईल बंद करा आणि बाहेर पहा' अशी सूचना केली. तुम्ह राहिलात तर बाहेर गोव्याने जे सुंदर विकास प्रकल्प उभे केले आहेत, ते पाहता येणार नाहीत असे पत्नी म्हणाली. मग मी खरोखर गोव्याचे हे नवे रूप पाहिले, असे ते स्मितहास्य करत म्हणाले. माझी मुले दरवेळी गोव्याला कधी जाणार, असे विचारतात. गोव्यात येणे व येथे राहणे मुलांना आवडते. गोवा राज्य मुळात आहेच आकर्षक. मी गोव्यात आलो की, घरीच आल्यासारखे वाटते. मी शेजारील महाराष्ट्राचाच आहे, असे त्यांनी नमूद केले. आपण शाकाहारी असल्याचा उल्लेखही त्यांच्या बोलण्यात आलाच.

सरकारकडून काम करून घेताना लोकांना त्रास होऊ नये असे गोयल यांना वाटते. आपण अधिकाधिक कामे ऑनलाईन केली आहेत. कुणीही कोणतीही लेखी सूचना करणारे पत्र पाठवले की आपण दखल घेतोच. त्या सूचनेचे काय झाले, कुठपर्यंत दखल घेतली गेली आहे हे मी सातत्याने माझ्या अधिकाऱ्यांना विचारून हैराण करतो. त्याबाबत मी अधिकाऱ्यांचा छळच करतो, असे गोयल यांनी मिश्कीलपणे नमूद केले. आपण ल लोकांची कामे लवकर व्हावीत म्हणून किती दक्ष आहोत हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गोवा सरकारने अधिकाधिक सेवा ऑनलाईन केल्या तर लोकांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत, असे गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना आवर्जून सांगितले. तुम्ही लोकांचे त्रास कमी करा असे गोयल यांनी सावंत यांचे नाव घेत नमूद केले. आता गोवा सरकार लोकांच्या यातना, त्रास व कष्ट किती कमी करते, ते गोंयकारांनी पहावे. गोव्यातील अनेक गावांमध्ये व शहरातदेखील नळाला नीट पाणी येत नाही, हे त्यांना कोण सांगणार? विजेचा तर बट्ट्याबोळच आहे.

- गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. 

- गोव्याने ते करायला हवे असा आग्रह गोयल यांनी धरला.

- गोव्यात प्रत्येक घराचे रुपांतर होम स्टेमध्ये करायला हवी, ही गोयल यांची सूचना काहीजणांना आवडणार नाही पण ही सूचना शब्दशा घेण्याचे कारण नाही.

- गोव्यात जास्त खर्च करू शकणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी व गोमंतकीयांना त्यातून उत्पन्न मिळावे या हेतूने ते बोलले.

 

Web Title: piyush goyal goa visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.