'प्लास्टर'च्या मूर्ती लागल्या तरंगू; विसर्जनस्थळावरील चित्र, पर्यावरणाच्या हानीसह बाप्पांची अहवेलना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:36 PM2023-09-26T12:36:12+5:302023-09-26T12:37:20+5:30
विसर्जन केलेल्या या मूर्तीचे पाण्यात विघटन न होता त्या किनाऱ्यावर तरंगू लागल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यातील दीड तसेच पाच दिवसांच्या गणपतींचे विर्सजन करण्यात आले आहे. तर काल, सोमवारी सात दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. परंतु, यंदाही अनेक गणेशभक्तांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना पसंती दिल्याचे दिसून आले आहे. कारण, विसर्जन केलेल्या या मूर्तीचे पाण्यात विघटन न होता त्या किनाऱ्यावर तरंगू लागल्याचे चित्र आहे.
एकीकडे पर्यावरणाची हानी तर दुसरीकडे बाप्पांची अहवेलना असेच काहीसे चित्र आता किनारी भागात दिसू लागले आहे. प्लास्टरच्या गणेशमूर्ती दिसायला अगदी आकर्षक तसेच हाताळण्यासाठी हलक्या. परंतु, पर्यावरणाला सर्वाधिक धोका याच मूर्तीमुळे बसत आहे. दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींचे विर्सजन होऊन बरेच दिवस झाले आहे. परंतु, प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती पाण्यात 'जैसे थे' आहेत. या मूर्तीचा रंग देखील उतरलेला नाही.
यातून या मूर्ती पर्यावरणाला किती घातक ठरत आहे, हे स्पष्ट होते. काही भक्तांनी आपण प्लास्टरच्या नाही तर शाडूच्या मूर्ती घेतल्याचे सांगितले. परंतु, त्याच मूर्तीचे अद्याप विघटन झाले नसल्याने तेही गोंधळात पडल्याचे दिसत होते. तर काही भक्तांनी पूजलेल्या प्लास्टरच्या मूर्तीना दगड बांधून पाण्यात सोडल्याचे समोर आले आहे.
किनाऱ्यावर निर्माल्य
अनेक विर्सजनस्थळी निर्माल्यांची विल्हेवाट लावण्याची सोय केलेली दिसत नाही. कचरापेटी देखील अनेक ठिकाणी नसल्याचे दिसून येत आहे. अशावेळी विसर्जनासाठी आलेले भक्त निर्माल्य थेट पाण्यात फेकतात. अनेक ठिकाणी निर्माल्याचा कचरा वाहून किनान्यावर आल्याचे चित्र आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. प्लास्टरपासून तयार केलेल्या मूर्तीसाठी वापरण्यात येणारे रंग रासायनिक असतात. यातून कर्करोग देखील होऊ शकतो. हाच रंग मासे खातात आणि नंतर त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे घातक केमिकल पोहचते. - डॉ. बबन इंगोले, माजी शास्त्रज्ञ.