पणजीत उद्यापासून प्लास्टिकबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 01:27 PM2018-10-01T13:27:57+5:302018-10-01T13:30:30+5:30
गोव्याच्या राजधानी शहरात मंगळवार (2 ऑक्टोबर) पासून महापालिकेची प्लास्टिकबंदी लागू होत आहे.
पणजी : गोव्याच्या राजधानी शहरात मंगळवार (2 ऑक्टोबर) पासून महापालिकेची प्लास्टिकबंदी लागू होत आहे. सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कप यावर बंदी घालण्यात आली असून केवळ कापडी, कागदी व काथ्याच्या पिशव्या वापरण्यास मुभा आहे.
महापालिका आयुक्तांनी शहरातील पदपथांवरील अतिक्रमणांविरुद्ध कारवाईसाठीही खास पथक स्थापन केले आहे. उद्यापासून शहरात प्लास्टिकबंदी लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जागृतीसाठी महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी यांनी सोमवार सकाळपासून घरोघर तसेच व्यावसायिक आस्थापनांना भेट देण्यास सुरुवात केली. नगरसेवक आपापल्या प्रभागांमध्ये घराघरात भेट देत असून कापडी तसेच काथ्याच्या अथवा कागदी पिशव्या मोफत वाटत आहेत.
प्लास्टिकबंदीबाबत महापालिका ठाम आहे. महापालिकेची बैठक गुरुवारी होऊन येत्या २ ऑक्टोबरपासून शहरात प्लास्टिकबंदी पूर्णपणे अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. ५0 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशव्याही वापरता येणार नाहीत. दरम्यान, राजधानी शहरातील अतिक्रमण केलेले पदपथ मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम महापालिका आयुक्त अजित रॉय यांनी हाती घेतली असून धडक कारवाईसाठी ग्रेड वन अभियंत्याच्या नेतृत्त्वाखाली अंमलबजावणी पथकही स्थापन केले आहे.
महापालिका निरीक्षकांबरोबरच दोन पोलीस हेड कॉन्स्टेबल्स तसेच एका पोलीस शिपायाचाही आयुक्तांनी या पथकात समावेश केलेला आहे. बाजारपेठेत तसेच शहरात अन्यत्र पदपथांवर आलेली अतिक्रमणे कोणतीही गय न करता हटविली जाईल, असा इशारा मनपा आयुक्त अजित रॉय यांनी दिला आहे. अनधिकृत फिरते विक्रेते, दुचाक्या रिपेअर करणारे ज्यांनी पदपथ बेकायदेशीररित्या अडविले आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.