पंतप्रधान मोदींची 12 एप्रिलला गोव्यात सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 06:18 PM2019-03-30T18:18:02+5:302019-03-30T18:23:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या 12 एप्रिल रोजी उत्तर गोव्यात सभा होणार आहे. प्रदेश भाजपाने त्याविषयीची तयारी सुरू केली आहे.
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या 12 एप्रिल रोजी उत्तर गोव्यात सभा होणार आहे. प्रदेश भाजपाने त्याविषयीची तयारी सुरू केली आहे.
मोदी यांची सभा गेल्या महिन्यात गोव्यात व्हावी असा प्रयत्न झाला होता पण सभा होऊ शकली नाही. गोव्यात तिसऱ्या मांडवी पुलाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान येतील असेही सरकारने अगोदर जाहीर केले होते पण पुलाच्या उद्घाटनाला मोदी पोहचले नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन केले गेले. मध्यंतरी खनिज खाण अवलंबितांनी पंतप्रधानांना खाण बंदीविषयी प्रश्न विचारण्याचे ठरविले होते. मात्र पंतप्रधान गोव्यात न पोहचल्यामुळे प्रश्न विचारता आला नाही. नंतरच्या काळात दिल्लीत खाण अवलंबितांना पंतप्रधानांची भेट मिळाली पण त्या भेटीतून काही निष्पन्न झाले नाही.
पंतप्रधानांची सभा म्हापसा किंवा पणजीत घेतली जाईल. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी मेरशी येथील शेतात असलेल्या भव्य जागेत मोदी यांची सभा झाली होती. गोव्यात 23 एप्रिलला निवडणुकीचे मतदान होणार आहे. यापूर्वी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचे संमेलन घेतलेले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनीही गोवा भेटीवर येऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.
दरम्यान, मैं भी चौकीदार मोहीमेला ज्या लोकांनी पाठींबा दिला आहे, अशा लोकांशी पंतप्रधान मोदी 31 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. देशात एकूण पाचशे ठिकाणी अशा प्रकारे संवादाचा कार्यक्रम होईल. गोव्यात पेडे म्हापसा येथील वृंदावर हॉस्पिटलजवळील रस्टीक रोज हॉलमध्ये आणि दक्षिण गोव्यात काकोडा- कुडचडे येथील काडा सभागृहात कार्यक्रम होईल. तिथे पक्षाचे नेते व कार्यकर्ते जमतील.