तीन दिवसांच्या भेटीनंतर पंतप्रधान दिल्लीस रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 07:56 PM2016-10-17T19:56:20+5:302016-10-17T19:56:20+5:30
ब्रिक्स परिषदेनिमित्त तीन दिवस गोव्यात घालविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दुपारी गोव्याचा निरोप घेतला
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १७ : ब्रिक्स परिषदेनिमित्त तीन दिवस गोव्यात घालविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दुपारी गोव्याचा निरोप घेतला. जाताना त्यांनी दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी चर्चाही केली आणि तुम्ही ब्रिक्सच्या तयारीबाबत चांगले काम केले, अशी पावतीही मुख्यमंत्र्यांना दिली.
14 रोजी रात्री पंतप्रधानांचे गोव्यात आगमन झाले होते. दि. 15 पासून दक्षिण गोव्यातील पंचतारांकित हॉटेलांमध्ये ब्रिक्स व बिमस्टॅक परिषद पार पडली. अनेक आंतरराष्ट्रीय करार झाले. रशिया, ब्राङिाल, दक्षिण आफ्रिका आदी अकरा देशांनी परिषदेत भाग घेतला. सोमवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून पाहुण्यांनी गोव्याचा निरोप घेण्यास आरंभ केला. पंतप्रधान मोदी हे दुपारी अडिचच्या सुमारास दिल्लीला निघाले. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी विमानतळावर जाऊन त्यांना निरोप दिला. रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांसाठी दुपारी पंचतारांकित हॉटेलमध्ये भोजनाचे आयोजन केले होते. गेले तीन दिवस गोव्यात अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. विमानतळासह अभूतपूर्व हवाई व सागरी सुरक्षा होती. अतिरिक्त सुरक्षा सोमवारी सायंकाळी मागे घेण्यात आली.
चीनची गुंतवणूक
दरम्यान, ब्रिक्स परिषदेला आलेली चीनसह अन्य देशांतील वरिष्ठ अधिका:यांची शिष्टमंडळे अजून गोव्यात आले. चीनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा केली. गोव्याच्या आयटी आणि थ्रीडी प्रिंटींग क्षेत्रत गुंतवणूक करण्यास चीन इच्छुक आहे. आम्ही या विषयाचा पाठपुरावा करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सोमवारी येथे लोकमतला सांगितले.