पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 01:07 PM2019-03-19T13:07:42+5:302019-03-19T13:25:36+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. मनोहर पर्रीकरांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर सावंत यांनी मध्यरात्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे नवे मुख्यमंत्रीप्रमोद सावंत यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. मनोहर पर्रीकरांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर सावंत यांनी मध्यरात्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
गोमंतकीयांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण शुभेच्छा देत असल्याचे नमूद करुन पंतप्रधान मोदी यांनी गोव्याच्या प्रगतीला नवी दिशा देण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षात राज्यात केलेल्या विकासकामांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. सावंत यांच्यासह 11 मंत्र्यांना मध्यरात्री राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी राजभवनावर शपथ दिली. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि मगोपचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर हे उपमुख्यमंत्री आहेत.
Best wishes to Dr. Pramod Sawant and his team as they begin their journey towards fulfilling the dreams of the people of Goa. I am sure they will build on the work done in the last few years and boost Goa’s growth trajectory.
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 19, 2019
प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी प्रमोद सावंत यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तसेच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक, निलेश काब्राल यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
Goa: Pramod Sawant takes oath as the new Chief Minister of the state, at the Raj Bhavan. pic.twitter.com/bFq1j1B80t
— ANI (@ANI) March 18, 2019
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच काँग्रेसने केलेला सत्तास्थापनेचा दावा आणि भाजपाचे सहकारी पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि मगोच्या नेत्यांनी ताठर भूमिका घेतल्याने सत्तास्थापनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेरीस मगो आणि गोवा फॉरवर्डच्या नेत्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची अट मान्य झाल्यानंतर भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता.
''पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन,'' असे प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर सांगितले. तसेच यावेळी आपल्या कारकीर्दीचे श्रेय सावंत यांनी मनोहर पर्रीकर यांना दिले. ''मी आज जो काही आहे तो मनोहर पर्रीकर यांच्यामुळेच आहे. मनोहर पर्रीकर हे मला राजकारणात घेऊन आले होते. त्यामुळे मी गोवा विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले तसेच आज माझी मुख्यमंत्रिपदी निवड झाली ती पर्रीकर यांच्यामुळेच झाली आहे."असे प्रमोद सावंत यांनी सांगितले.