स्थानिक सरकारांपेक्षा मोदींचा प्रभाव अधिक; भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 12:59 PM2024-04-26T12:59:35+5:302024-04-26T13:00:23+5:30
अनेक राज्यांत पक्षाच्या स्थानिक सरकाराच्या प्रभावापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव अधिक असल्याचे जाणवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: अनेक राज्यांत पक्षाच्या स्थानिक सरकाराच्या प्रभावापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव अधिक असल्याचे जाणवले आहे. गोवाही त्याला अपवाद नाही, असे मत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
'गोव्यात स्थानिक सरकारवर लोक नाराज आहेत, ते केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी यावेळीही मतदान करतील काय? असा प्रश्न तावडे यांना विचारला असता ते म्हणाले की, 'नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे या विचाराने लोक अधिक भारलेले आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर नाराजी असली तरी लोक मोदींसाठी भाजपला मतदान करतील आणि गोव्यातही तसेच जाणवले, असे तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तावडे म्हणाले की, 'एकीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी जनतेच्या मनात भीती पसरवत आहे की, घटनेत बदला करण्यासाठी भाजपाला ४०० पास जागा हव्या आहेत. दुसरीकडे त्यांचेच नेते गोव्याला विशेष दर्जा देण्यासाठी राहुल गांधी यांच्या परवानगीने घटनेत बदल करणार असल्याचे सांगत आहेत. एकीकडे काँग्रेस इनहेरिटन्स टॅक्स म्हणजे वारसा कर लागू करण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकार ठोस योजना राबवून त्याची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात वळवत आहे. नेतृत्वहीन इंडिया आघाडीकडे सत्ता सोपवायची की विकसित भारतचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्याला परत पंतप्रधान बनवायचे, याचा निर्णय जनतेने घेतला पाहिजे. प्रदेश सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर व प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर उपस्थित होते.