कुडचडेत मोदींची सभा शक्य; भाजपकडून तयारी सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2024 12:27 PM2024-04-14T12:27:30+5:302024-04-14T12:28:55+5:30
साधारण दि. २८ एप्रिल ते १ मे या कालावधीत सभा घेण्याचे नियोजन असून, सभेसाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजप दक्षिण गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा घेण्याच्या तयारीत आहे. स्थानिक नेते केवळ पंतप्रधानांच्या होकाराच्या प्रतीक्षेत आहेत. साधारण दि. २८ एप्रिल ते १ मे या कालावधीत सभा घेण्याचे नियोजन असून, सभेसाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे.
यावेळी गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दक्षिण गोवा कोणत्याही परिस्थितीत जिंकणे हे प्रमुख लक्ष्य बनवले आहे. त्यासाठी रणनीतीही ठरविण्यात आली आहे. पक्ष कार्यकर्त्यांना आणि मतदारांना विश्वास मिळावा यासाठी पंतप्रधान मोदी यांची मोठी जाहीर सभा आयोजित करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. ही सभा कुडचडे येथे घेण्याचेही ठरले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. यासाठी पंतप्रधानांच्या होकाराची प्रतीक्षा पक्षाला आहे. पंतप्रधानांनी वेळ दिला तर ही सभा निश्चित घेतली जाणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तनावडे यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले की, गोव्यातील स्टार प्रचारकांच्या यादीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आहे. त्यामुळे गोव्यात त्यांची सभा होईलच. त्यांना पक्षाकडून प्रस्ताव पाठविला आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर याविषयी सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, दक्षिणेचा किल्ला सर करण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. पक्षाच्या उमेदवार पल्लवी धेपे या मतदारांना भेटत आहेत. दक्षिण गोव्यातील सर्वच आमदार आणि मंत्री प्रचारात सक्रिय झाले आहेत.
शाह, नड्डा, राजनाथ गोव्यात स्टार प्रचारक
भाजपचे राष्ट्रीय स्टार प्रचारक देशभर प्रचारात व्यस्त आहेत. गोव्यातही स्टार प्रचारक येणार आहेत. गोव्याच्या यादीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आहे. तसेच गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची नावे आहेत, अशी माहितीही सदानंद शेट तनावडे यांनी दिली आहे.