पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ फेब्रुवारी रोजी गोव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2024 07:38 AM2024-01-24T07:38:35+5:302024-01-24T07:40:12+5:30
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बैठकीत कार्यक्रमाची माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ फेब्रुवारी रोजी गोव्यात येणार असून, बेतुल येथे इंडिया एनर्जी विक कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर मडगाव येथे त्यांचा शासकीय कार्यक्रम होणार आहे. काही सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी कार्यक्रमही होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बैठकीत कार्यक्रमाची माहिती दिली.
बैठकीनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, मोदींचा कार्यक्रम पूर्णपणे शासकीय स्वरूपाचा आहे, त्यामुळे प्रसार माध्यमांना मुख्यमंत्रीच माहिती देतील. बेतुल येथील कार्यक्रम आटोपून मोदी हेलिकॉप्टरने मडगावला येतील.
दरम्यान, राममूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम आटोपल्याने आता भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. तानावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९, १० व ११ फेब्रुवारी असे तीन दिवस पक्षाने 'गांव चलो अभियान' आयोजित केले असून, सर्व १७२२ बुथवर प्रमुख कार्यकर्ते जातील. एका बुथावरील कार्यकर्ता दुसऱ्या बुथवर जाईल, तसेच पक्षाचे नेतेही भेट देतील.
भाजपने येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध आघाड्याही सक्रिय केल्या आहेत. दक्षिण गोवा भाजप महिला मोर्चाची बैठक आयोजित केली असून, म्हापशात व्यापाऱ्यांचा मेळावाही भरविला जाणार आहे.